साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 जून 2020
श्रीरामपूर | सुफी संत हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी न्युज 18 इंडिया वाहिनी वर बंदी घालावी व अमिश देवगणवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आहे. याबाबत प्रशासनामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हंटले आहे की, न्युज 18 इंडियाचे अँकर अमिश देवगण हे नेहमी समाजात धार्मिक भावना दुखावल्या जातील असे वक्तव्य करतात. ते त्यांच्या कार्यक्रमात विविध धर्मीय लोकं बोलवून त्याच्यात धार्मिक तेढ निर्माण होईल असे प्रश्न करत असतात.
कालच्या शोमध्ये मुस्लिमांसाठी दैवत असणाऱ्या सुफी संत हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिश्तीबद्दल अपशब्द वापरुन मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे, कोणत्याही धर्माबद्दल अपशब्द वापरून समाजात दुही निर्माण होऊ नये म्हणून या चॅनलवर बंदी घालून अमिश देवगण वर गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनावर समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, तालुकाध्यक्ष फैय्याज कुरेशी, शहराध्यक्ष इमरान इराणी, अरबाज कुरेशी, दानिश पठाण, जकरिया सय्यद, तन्वीर शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.