श्रीरामपूर | महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 16 जून 2020 रोजी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार 283 कामगारांची एकूण रक्कम रुपये 92 लाख 54 हजार 570 इतकी कामगार न्यायालय अहमदनगर यांचे कोर्टात कामगारांना अदा करणेकामी भरणा करण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड बाळासाहेब सुरुडे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात दिली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना 1 एप्रिल 2001 पासून सक्तीने कपात करण्यात आले होते. रोजंदारी कामगारांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली होती, परंतु उपदान कायदा 1972 नुसार रोजंदार कामगारांना ग्रॅज्युटी ची रक्कम देणे आवश्यक असताना विद्यापीठाने ती दिली नाही, यासाठी अनेक कामगारांनी कामगार न्यायालय अहमदनगर यांचेसमोर ग्रॅज्युटी मिळणे कामी अर्ज दाखल केले होते. याआधी सुमारे 900 कामगारांनी न्यायालयामार्फत ग्रॅज्युटीची रक्कम प्राप्त करून घेतलेली आहे. सन 2017 ते 2019 मध्ये 312 कामगारांनी ग्रॅज्युटी मिळणे कामी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. न्यायालयाने प्रत्येक अर्जदार कामगाराची रक्कम निश्चित करून ग्रॅज्युटी रक्कम देणे विषयक आदेश करून त्यावर दहा टक्के व्याज ही देण्याचे आदेश दिले.
सदर निर्णय निवडीचे अंमलबजावणी कामी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक विजय कोते, कामगार कल्याण अधिकारी अविनाश तांबे, संघटनेचे सरचिटणीस कॉ.बाळासाहेब सुरुडे, अध्यक्ष कॉ. गुजाबा लकडे यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक होऊन अंमलबजावणी करणेविषयी चर्चा करण्यात आली. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने सदरची रक्कम न्यायालयात डिपॉझिट केली आहे व व्याजाची रक्कम सहा महिन्यात अदा करण्याचे व इतर प्रलंबित न्याय निवाड्यानुसार लवकरच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे.