साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 जून 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) श्रीरामपूर नगर पालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका शिक्षण मंडळांना नगरपालिकेकडून मिळणारे 10 व 20 टक्के अनुदान वेळेवर मिळत नसल्याबाबत तक्रार प्राप्त झाली असून या प्रश्नी आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासन नगरविकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिले.
श्रीरामपूर नगर पालिका शिक्षण मंडळास शासनाकडून नव्वद टक्के व नगरपालिकेकडून दहा टक्के अनुदान दिले जाते . परंतु नगर विकास खात्यातर्फे येणारे अनुदान यावेळी सरळ नगरपालिकेच्या खात्यात आल्याने नगरपालिका सदर अनुदान शिक्षण मंडळास देण्याची टाळाटाळ करीत असल्याने शिक्षण मंडळातील शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचे पगारास गेले काही महिने विलंब होत आहे. पूर्वी हे अनुदान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेळेवर मिळत होते. परंतु नगर परिषदेस परस्पर नगर विकास विभागाकडून अनुदान आल्याने व पालिकेने शिक्षण मंडळाचा हिस्सा न दिल्याने सेवानिवृत्ती वेतन मिळण्यास देखील विलंब होत आहे. याबाबत सेवानिवृत्त शिक्षक संघटनेने नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नी लक्ष वेधले आहे. मात्र अनुदान कमी आल्याचे कारण देऊन अनुदान देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तरी याबाबत शासनाकडून नगरपालिका शिक्षण मंडळाला 100 टक्के अनुदान देण्यात यावे व प्रलंबित अनुदान सुद्धा लवकर देण्यात यावे. या बाबत सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे नगरपालिका विभागाचे प्रतिनिधी प्रताप देवरे, प्रकाश माने, शिरीष भागवत, विलास निकम, रामदास उगले, अशोक गायकवाड, शब्बीर शेख, बापू टाक, रामचंद्र हेलकुटे आदी उपस्थित होते.