Dayamabad : महाराष्ट्रातील आद्यशेतकरी व मानवी वसाहत असलेले दायमाबाद

Dayamabad

       महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील 'दायमाबाद' हे पुरातत्वीय उत्खनन स्थळ असून या ठिकाणी  सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. या ठिकाणी रथ , हत्ती , गेंडा , पुरातन खापराची भांडी आदी अतिप्राचीन अवशेष सापडलेले आहेत. दायमाबाद हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे सर्वात मोठे ठिकाण आहे. दायमाबाद ही महाराष्ट्रातील आद्यशेतकरी व मानवी वसाहत असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी जे पुरातत्विय अवशेष सापडले आहेत ते सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या  सिंधू संस्कृतीचे अवशेष असल्याचे सिद्ध झाले आहे. 
Dayamabad

          दायमाबाद हे पाच संस्कृतींचा संगम असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे. सिंधू ,  मोहंजोदाडो , वाळवा , हडप्पा , जोर्वे अशा संस्कृत्या एकाच ठिकाणी असणारे दायमाबाद हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे. आजही या ठिकणी रंगीत लालसर रंगाची नक्षीकाम असलेली खापरे अस्तव्यस्त पडलेली दिसतात. दायमाबाद हे पुरातन विस्तीर्ण क्षेत्र असून प्रचंड चढउतार असलेले ठिकाण आहे. तेथे काही ठिकाणी पांढऱ्याफटक बारीक चिकन मातीचे थर आहेत तर काही ठिकाणी तांबड्या काळ्या मातीचे थर आहेत. आजही या प्राचीन नगरीत फिरताना  हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीची कल्पना डोळ्यासमोर उभी राहते.  
 
                  राजेश बोरुडे 
                मो.9960509441
              
     'दायमाबाद' या ठिकाणी सापडलेले पुरातत्वीय अवशेष पुन्हा या ठिकाणी आणून दायमाबाद हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आणणे आवश्यक आहे. केंद्र सरकार , राज्य सरकार व पुरातत्व विभाग यांनी संगठीत प्रयत्न केल्यास दायमाबाद हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ होऊ शकते. प्रवरा नदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात असणारे महराष्ट्रातील सर्वात मोठे व अतिप्राचीन दायमाबाद हे ठिकाण प्राचीन महाराष्ट्राची जणू काही राजधानीच होते.  

            दायमाबाद हे पुरातत्वीय उत्खनन स्थळ प्रवरा नदीच्या खोऱ्यालगत आहे. दायमाबाद हे ठिकाण अतिशय विस्तीर्ण असून त्यास चारही बाजूने लोखंडी जाळीचे संरक्षक कंपाउंड करण्यात आलेले आहे. या संरक्षित स्थळाच्या पश्चिमेला एका गेट व उत्तरेला कोपऱ्यात दुसरे गेट आहे. या पुरातन क्षेत्रालगत अतिशय मनमोहक असा निसर्गरम्य असा प्रवरा खोऱ्याचा खडकाळ परिसर आहे. या  अतिप्राचीन क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सध्या काही ठिकाणी दाट तर काही ठिकाणी विरळ बाभळीची झाडे आहेत. आजही याठिकाणी अतिशय खोल निर्जल पुरातन विहीर आहे. दायमबादच्या या निसर्गरम्य क्षेत्रात एका दगडी चौथाऱ्यावर सुंदर अशी हनुमानाची मूर्ती असून त्यावर शेंदूर लावलेला आहे. या मूर्तीशेजारी छोटे शिवलिंग असून इतरही छोट्या मुर्त्या आहेत.  

सिंधू संस्कृती  विहीर

              1958 साली येथे पुरातत्व खात्याकडून अल्पकाळ उत्खनन करण्यात आले होते. 1972 साली येथे पुन्हा उत्खनन करण्यात आले तेव्हा याठिकाणी सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषांमुळे दायमाबाद हे अतिप्राचीन स्थळ असल्याचे सिद्ध झाले. 1972 मध्ये येथे विविध धातूच्या मुर्त्या सापडल्या. त्यात रथ , हत्ती , गेंडा आदी मुर्त्या आढळल्या.  1920 साली मोहंजोदाडो व  हडप्पा या दोन प्राचीन शहरांचा शोध सिंधू नदीच्या खोऱ्यात लागला. याच सिंधू संस्कृतीशी साम्य असणारे अवशेष हजारो मैल दूरवरच्या प्रवरा नदीच्या खोऱ्यालगत दायमाबाद या ठिकाणी सापडले आहेत. 1958-59 साली भारतीय पुरातत्त्व विभागाचे त्यावेळचे सरसंचालक एम.एन. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दायमाबाद येथे उत्खनन झाले. त्यानंतर १९७४ ते ७९ पर्यंत डॉ. शंकरराव साळी यांनी केलेले उत्खनन सर्वात यशस्वी म्हणावे लागेल. दायमाबाद येथे खापरावरील रंगीत जोर्वे  संस्कृती  आढळते. येथे तांब्याचा गेंडा, रथ, हत्ती यांच्या जवळजवळ ६५ किलो वजनाच्या मूर्ती आढळल्या. डॉ. साळी यांनी केलेल्या उत्खननातून मिळालेल्या ७५ सांगाड्यांची शास्त्रीय पाहणी केली गेली. येथे उत्तर हडप्पाकालीन थरात मिळालेला एका माणसाचा सांगाडा, दायमाबादला थेट सिंधू संस्कृतीपर्यंतघेऊन जातो.

          भारताचा इतिहास प्राचीन वैभवाने संपन्न आहे व समृद्ध आहे. प्राचीन भारताच्या इतिहासात सिंधू संस्कृती ही प्रमाणभूत संस्कृती मानली जाते. या संस्कृतीचे अवशेष अनेक ठिकाणी सापडलेले आहेत. 1972 मध्ये शेतकऱ्यांना खोदकाम करताना काही मुर्त्या सापडल्या होत्या. त्यावेळी येथील स्थानिक शेतकरी पटेल यांनी याचा पाठपूरावा केला पुरातत्व खात्याला याची माहिती दिली. त्यानंतर येथे अनेक वर्ष संशोधन चालले. त्यानंतर अनेक वस्तू सापडल्या. त्यात हाडांचे सांगाडे , हत्यारे , अन्नधान्य , सव्वासहा फूट हाडांचा सांगाडा व त्याच्याशेजारी 108 मण्यांचे गाडगे सापडले.  ब्रॉन्झ धातूच्या वैशिष्ट्यपूर्ण सुंदर अशा कोणत्याही ठिकाणी न सापडलेल्या सुंदर सुबक आकर्षक मुर्त्या सापडल्या.
सिंधू संस्कृती

'दायमाबाद' या ठिकाणी उत्खननात आढळलेला ब्रॉझ धातूचा इतक्या चांगला ,  सुंदर , सुबक रथ जगात कोठेही सापडलेला नाही. दायमाबाद हे पाच संस्कृतींचा संगम असणारे एकमेव असे ठिकाण आहे. यात सिंधू ,  मोहिनजोदाडो ,  हडप्पा , वाळवा , जोर्वे  अशा पाच संस्कृतींचा संगम फक्त महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात असणाऱ्या दायमाबाद या ठिकाणी आहे. दायमाबाद या ठिकाणी सापडलेल्या सुंदर, सुबक व आकर्षक मुर्त्या या केवळ दायमाबाद याच ठिकाणी सापडलेल्या आहेत. रथ , हत्ती, गेंडा आदी,नक्षीकाम केलेली खापराची भांडी या ठिकाणी उत्खननात सापडले आहेत. मोहोंजोदडो , हडप्पा या ठिकाणी सुद्धा असे सिंधू संस्कृतीच्या एवढ्या सुंदर मुर्त्या आढळल्या नाहीत त्या भारतातील दायमाबाद या ठिकाणी सापडल्या. सिंधू संस्कृतीच्या लोकांनी दायमाबाद या ठिकाणी येताना एका सर्वात महत्वाचे काम केले ते म्हणजे येथे येताना त्यांनी आपल्या बरोबर बाजरी , बार्ली , गही ,ज्वारी हे अन्नधान्य आणलं. या ठिकाणी आजही त्या काळातील 200 फुटापेक्षा खोल विहीर असून त्या विहिरीच्या विटांचा आकार व रचना सिंधू संस्कृतीशी साधर्म्य असणारा आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post