साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 जून 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) आमच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातील संपुर्ण कामकाजाची निपक्षपातीपणे चौकशी करुन आम्ही दोषी आढळल्यास आमच्यावर फौजदारी कारवाई करा, असे आव्हानच बेलापूरचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी देवुन सत्ताधाऱ्यांना एक प्रकारे घरचा आहेरच दिला आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या राधाताई बोंबले या सरपंच असुन सर्व कारभार त्यांच्या वतीने बाजार समितीचे संचालक सुधीर नवले हे पहात आहेत. सत्ताधारी पार्टीचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी मागील मासिक बैठकीत आपला विरोध नोंदवुन यापुढे आमच्या परवानगी शिवाय आर्थिक व्यवहार करु नये, असे लेखी दिलेले असतानाही एक तास उलटत नाही तोच एक धनादेश देण्यात आला. त्यामुळे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी ग्रामविकास अधिकार्याकडे विविध माहीती मागीतली असुन पंधरा दिवस होवुनही ती माहीती दिली गेली नाही. त्यामुळे, खटोड यांचा पारा चांगलाच चढला. या वेळी ग्रामपंचायतीतील सर्व कामे ही पारदर्शीच झाली पाहीजे, चुकीचे काम करणारांना आम्ही पाठीशी घालणार नाही असे म्हणताच बाजार समितीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की, माजी सरपंच भरत साळुंके यांच्या काळातील सर्व कामे नियमाने झाली का ? टाळ खरेदी कोणत्या पध्दतीने झाली? त्यावर रविंद्र खटोड यांनी आम्ही पारदर्शी कारभार केला असुन टाळ खरेदी करताना ई परचेसींग केलेले आहे आणी आमच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्याचा अर्ज मीच देतो अन दोषी सापडलो तर फौजदारी कारवाई करा. पण कुणाचेही चुकीचे काम यापुढे खपवुन घेणार नाही. अंगणवाडीचे साहीत्य सदस्यांना न विचारता खरेदी केलेच कसे? कोणत्या बैठकीत हा विषय घेतला हे दाखवुन द्या? ग्रामपंचायतीने खरेदी केलेला संगणक दुसऱ्याच्या घरी गेलाच कसा? तो कुणाच्या घरी होता? त्या अधिकार्याचे लेखी पाहीजे, अशी तंबीच खटोड यांनी ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना दिली.
सीसीटिव्ही खरेदीची सर्व कागदपत्रे मला हवी आहे असे बजावुन टाळ खरेदीच्या कागदपत्राचीच फाईल उपस्थित सर्वासमोर ठेवुन कुणीही चौकशी करा, असेही खटोड यांनी बजावले. या वेळी माजी सदस्य अशोक गवते यांनी नळ कनेक्शनचे पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी खटोड यांनी तातडीने गवते यांना बोलावुन खुलासा करण्यास सांगितले गवते यांनीही आडीच वर्षात मी एकाही व्यक्तीकडून पैसे घेतले नसुन ज्यांचे म्हणणे असेल ते पैसे ग्रामपंचायत कार्यालयात जमा झालेले असेल असे सांगितले. यावेळी खटोड यांनी राजकारण हा आमचा धंदा नसुन आम्ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन काम करत असल्याचे सांगितले.
ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकांसमोरच दोन नेत्यामध्ये चांगलीच तु..तु.,.मै..मै..झाली. त्याची दिवसभर गावात चर्चा असुन गावात चाललेली सर्व विकास कामे ही पारदर्शिपणे व्हावीत अशीच नागरीकांचीही अपेक्षा आहे.