Containment :संगमनेर शहरातील मोना प्लॉट आणि वाबळे वस्ती कन्टेन्टमेंट झोन घोषित

साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 जून 2020
अहमदनगर | संगमनेर शहरातील मोना प्लॉट आणि वाबळे वस्ती हा भाग कन्टेंनमेंट झोन तर कोल्हेवाडी रस्ता बफर झोन म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून या भागात आजपासून ते 17 जून रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. तसेच कन्टेनमेंट झोन क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा, इतर आस्थापना बंद राहणार असून नागरिकांच्या येण्याजाण्यावरही प्रतिबंध करण्यात आला आहे.


          राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड-19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.  

          कंटमेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्‍थापना, दुकाने, अत्‍यावश्‍यक सेवा, वस्‍तु विक्री सेवा इ. व बफर झोन  क्षेत्रातील अत्‍यावश्‍यक सेवा वगळता सर्व आस्‍थापना, दुकाने, वस्‍तु विक्री सेवा इ. दिनांक 4 जून 2020  सायंकाळी 05 वाजेपासून ते दिनांक 17 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्‍याबाबत या आदेशाद्वारे आदेशीत करीत आहे. सदरच्‍या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्‍थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्‍यात येत आहे.

          कंटमेंट झोन -संगमनेर शहरातील मोना प्‍लॉट व वाबळे वस्‍ती, बफर झोन-कोल्‍हेवाडी रस्‍ता, ये-जा करण्यासाठी मार्ग- कोल्‍हेवाडी रस्‍ता पुल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्‍यासाठी स्‍थानिक प्रशासनाने खालील प्रमाणे कार्यवाही करावी. पब्लीक ॲड्रेस सिस्टीमद्वारे सदरचा आदेश उद्घोषित करण्‍यात यावा. कंट्रोल रुम स्‍थापन करुन 24 x 7  कार्यरत ठेवावी. सदर ठिकाणी 3 ते 4 अधिकारी / कर्मचारी यांची नेमणूक करण्‍यात येवून प्रत्‍येक शिफ्टमध्‍ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्‍द करण्‍यात यावेत. संगमनेर शहरातील उपरोक्‍त कंटमेंट झोन व बफर झोन  या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, संगमनेर हे सनियंत्रण अधिकारी म्‍हणून कामकाज पाहतील. सदर क्षेत्रामध्‍ये सेवा देणा-या सर्व शासकीय कर्मचारी यांना सनियंत्रण अधिकारी यांनी ओळखपत्र द्यावेत. इंट्री एक्झिट पॉईंटस चे ठिकाणी तातडीच्‍या वैद्यकीय सेवा व जीवनावश्‍यक वस्‍तुंची वाहतुक व वितरण व्‍यवस्‍थेशिवाय इतरांना प्रतिबंध करण्‍यात यावा. इंट्री एक्झिट पॉईंटस चे ठिकाणी ये-जा करणा-या व्‍यक्‍तींची थर्मल स्‍कॅनरद्वारे स्क्रिनिंग करण्‍यात यावी. कंट्रोल रुम मध्‍ये रजिस्‍टर ठेवून त्‍यामध्‍ये नोंदी घेण्‍यात याव्‍यात व नागरीकांना आवश्‍यक त्‍या जीवनावश्‍यक वस्‍तु  सशुल्‍क पु‍रविण्‍यात याव्‍यात. तसेच प्राप्‍त होणा-या सर्व तक्रारींचे निरसन करण्‍यात यावे. सदर क्षेत्रातील रहिवाशी यांना आवश्‍यक असणा-या बाबी जसे दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्‍यादी बाबी योग्‍य ते शुल्‍क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्‍यात याव्‍यात. त्‍याकामी जीवनावश्‍यक वस्‍तुंचे व्‍हेंडर निश्चित करुन, पथके तयार करुन खरेदी व विक्री, वाहतुक इत्‍यादी बाबींचे सुक्ष्‍म नियोजन करावे. या क्षेत्रातील सर्व बँकांनी बँकींग सुविधा बँकर कोरोसपाँडन्ट मार्फत उपलब्‍ध करुन द्याव्‍यात. पोलीस विभागाने सर्व पर्यायी रस्‍ते बंद करुन इंट्री एक्झिट पॉईंटस मोवेबरल बॅरेकसद्वारे खुले ठेवावेत.

          या प्रतिबंधीत भागामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक असल्‍याचे निदर्शनास आल्‍याने येथील नागरीकांच्‍या हालचालींवर निर्बंध आणणे आवश्‍यक ठरले आहे. त्‍यामुळे सदर भागातील नागरिकांना विविध कारणांसाठी शासकीय आस्‍थापनांकडून देण्‍यात आलेल्‍या वाहन वापर व वाहतुकीची सवलत रद्द करण्‍यात येत आहे. या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्‍यार्थ असलेल्‍या व्‍यक्‍तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्‍याच्‍या ठिकाणी जाणे आवश्‍यक असल्‍यास, अश्‍या व्‍यक्‍तींची त्‍यांच्‍या कर्तव्‍याच्‍या ठिकाणी वास्‍तव्‍याची सुविधा संबंधीत आस्‍थापनांनी उपलब्‍ध करुन दयावी. जेणेकरुन कोरोना संक्रमणशील क्षेत्रातील त्‍यांच्‍या हालचालींवर निर्बध घालणे शक्‍य होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post