साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 जून 2020
अहमदनगर | अहमदनगर येथील बोल्हेगाव परिसरात विधवा आई व बहिणी बरोबर राहत असलेल्या अल्पवयीन मुलास त्याच्या घरात घुसून मारहाण करून त्याचा वेळोवेळी छळ केल्याप्रकरणी संबंधित तोफखाना पोलीस अधिकारी व पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नव्हती. त्यामुळे, या प्रकरणाची स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येऊन यात दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
संबंधित पोलिस अधिकारी व पोलिसांनी या मुलास त्यांच्या कार्यालयात आल्यानंतर या गुन्ह्याशी संबंधित असलेले सर्व व्यक्तींना बोलावून त्यांच्या विरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न करता या प्रकरणास घरगुती वाद हा मुद्दा उपस्थित करून सदर मुलास तेव्हापासून ते तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होईपर्यंत काही दिवस झुलवत ठेवले. संबंधित पोलिसांनी वेळकाढूपणा करून या मुलास चाईल्ड लाईनकडे पाठविले. पदाधिकाऱ्यांकडून जाब जबाब घेऊन त्याच्या वतीने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे ,अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, बाळू घाटविसावे व अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल केले. या अल्पवयीन मुलास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचे कलम लावण्यात आले नाही. ते त्वरित लावण्यात यावे. ज्यावेळेस संबंधित मुलगा हा पोलीस स्टेशनमध्ये गेला त्याच वेळेस अशा प्रकारची कारवाई होणे अनिवार्य होते; परंतु, तोफखाना पोलिसांनी सदर मुलांची फिर्याद न नोंदविता शासकीय पदाचा गैरवापर करून स्वतःचा स्वार्थ व फायदा करिता सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या अधिनियमाचे उल्लंघन केलेले आहे. सदर घटनेप्रसंगी वेळोवेळी उपस्थित असलेले पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांनी पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्याविरुद्ध शासकीय नियमाप्रमाणे कर्तव्यात कसूर केला. सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करून आरोपींना या गुन्ह्यांमध्ये अटक न करता त्यांना पळून जाऊन अटकपूर्व जामीन मिळविता यावा, यासाठी सहकार्य केले म्हणून त्यांची स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येऊन या प्रकरणांमध्ये दोषी आढळणाऱ्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, गृह मंत्री गृहमंत्री अनिल देशमुख, पालक मंत्री हसन मुश्रीफ, पोलीस महासंचालक, पोलिस उपमहासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व संबंधित अधिकार्यांकडे केली आहे.