साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 जून 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील नेवासा रोड येथील बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेल्या ऍक्सिस बँकेच्या एटीएम मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाली असता मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, नगरसेवक दीपक चव्हाण, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होत समयसुचकता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सायंकाळी श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड येथील बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेल्या ऍक्सिस बँकेच्या एटीएम मशिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली.
घटनेची मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्यासह नगरसेवक जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, दीपक चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता व इतर दुकानांना या शॉर्ट सर्किटचा फटका बसू नये म्हणून शहर पोलीस स्टेशन व नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागाला पाचारण करण्यात आले.
एटीएम मशीनच्या विद्युत तारा तोडून व आगीला आटोक्यात आणण्यात अग्निशामक विभागाचे कर्मचारी मनोज शर्मा, अनुप झरेकर, विजय बागडे, बाळू दराडे यांना यश आल्याने आजूबाजूच्या दुकांनाची कोणतीही हानी झाली नाही.
एटीएम मशीनमध्ये आगीपासून बचावाची कोणतीही यंत्रणा नव्हती. तसेच शहरातील जास्तीत जास्त एटीएम मशीनमध्ये सुरक्षा रक्षक नसल्याने शहरातील मशीनच्या मर्यादा पुन्हा उघड्या पडल्या असून सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे उघड झाले आहे.