श्रीरामपूरात लॉकडाऊनच्या भीतीने दारू दुकानासमोरची गर्दी वाढली ; अफवांचे उदंड पीक

साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 जून 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) शहरात गोंधवणी रोड परिसरामध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर शहर लॉकडाऊन होणार, अशी जोरदार अफवा पसरली. त्यातच नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्रांत अधिकार्‍याकडे संपूर्ण श्रीरामपूर शहर सात दिवसासाठी बंद करण्याची मागणी केल्याने आता शहर बंद होणार या भीतीने सर्वत्र धावपळ उडाली. शहर बंद झाल्यास आपली अडचण होऊ नये म्हणून शहरातील मद्यपिंनी दारूच्या दुकानासमोर मोठी गर्दी केल्याचे चित्र  दुपारी शहरातील सर्व दारू दुकानासमोर दिसून आले. या गर्दीची सर्वत्र चर्चा होत आहे.


            सकाळी गोंधवणी रोड परिसरामध्ये कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने त्या भागातील रस्ते बंद करण्यात आले. तसेच सदर रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला सुद्धा कोरंटाईन करण्यात आले. शहरांमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याचे समजताच शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी नगराध्यक्षा  अनुराधाताई आदिक यांनी संपूर्ण शहर सात दिवसासाठी लॉक डाउन करण्याची लेखी मागणी प्रांत अधिकार्‍याकडे केली. दरम्यान,  सोशल माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरण्यास सुरुवात झाली. शहरांमध्ये लॉकडाऊन होणार असल्याने नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी साठी दुकानांवर मोठी गर्दी केली. इतर दुकानांवर गर्दी होत असतानाच शहरातील दारू विक्रीच्या वाईन शॉप समोर देखील मोठ्या रांगा पहावयास मिळाल्या. जर शहर बंद झाले तर आपली अडचण नको तसेच ज्यादा पैसे मोजावे लागू नये म्हणून आजच स्टॉक करून ठेवलेला बरा अशा प्रतिक्रिया दुकानासमोरील मद्यपींनी हसत-हसत व्यक्त केल्या. यानंतर काही वेळातच प्रांताधिकार्‍यांनी नगराध्यक्षांच्या पत्राला दिलेले उत्तर सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेे. यात शासनाच्या नियमानुसार शहरात पेशंट जरी सापडला असला तरी संपूर्ण शहर बंद करता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कमांडंट ऑफिसर म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती केली असून तहसीलदार परिस्थिती पाहून निर्णय घेतील असे नगराध्यक्षांना कळविले. त्यानंतर काही वेळातच गोंधवणी रोड कॅनल च्या पुलापासून बंद करून हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला.

              नगराध्यक्षांनी प्रांत अधिकार्‍याकडे शहर बंद करण्याची मागणी केल्यानंतर शहरवासीयांना कडून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. शहरातील व्यवहार आत्ताशी कुठे सुरळीत सुरू झाले असून गोरगरीब लोकांची परवड होऊ नये म्हणून संपूर्ण शहर बंद न करता ज्या भागामध्ये रुग्ण आढळला तो भाग सील करण्यात यावा अशी मागणी बहुतांश नागरिकांनी केली. त्याचबरोबर शहरातील इतर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रस्त्यावरची गर्दी टाळावी . गरज असेल तरच बाहेर पडावे . घरातील एकाच व्यक्तीने बाहेर येऊन सर्व कामे करावीत . इतरांनी शक्यतो घरातच राहावे . मास्कचा वापर करावा . सोशल डिस्टंसिंग करण्यात यावे . अशा पद्धतीच्या अनेक सूचना सोशल माध्यमाद्वारे लोकांनी केल्या .
 प्रशासनाने सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून गोंधवणी रोड हा भाग बंद करून त्या रोडची वाहतूक बंद केली . शहरामध्ये पहिल्यांदाच कोरोना पेशंट सापडल्यामुळे शहरवासीयामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दुसरीकडे पेशंट कमी होत असताना आपल्याकडे मात्र आता सुरुवात झाली आहे . एकाचे तीन पेशंट झाल्याची अफवा सुद्धा संध्याकाळी शहरांमध्ये पसरली होती. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post