साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 जून 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर शहरातील झालेल्या रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण करत घंटानाद केला. सदर उपोषणाला आमदार लहू कानडे यांनी भेट देऊन उपोषण सोडवले.
यावेळी आमदार कानडे म्हणाले की, श्रीरामपूर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले पाहिजे. हा सत्ताधारी तो विरोधक असा भेदभाव न करता सगळ्या नगरसेवकांना सारखी वागणूक दिली पाहिजे. सध्या नगरपरिषदेत पक्षपातीपणाचे राजकारण चालू आहे.
शहरात उपनगराध्यक्ष करण ससाणेंसह काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागाकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पालिका प्रशासनाने यावर त्वरित निर्णय न घेतल्यास पर्यायाने आम्हाला शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल.
श्रीरामपूरातील जनतेच्या शेवटच्या प्रवासात देखील अडथळे असल्याचे मोठं दुःख आहे. अमरधाम समोरील रोडसाठी लवकरच निधी उपलब्ध करण्याकरिता पाठपुरावा करणार असून सदर रस्त्याचे काम त्वरित मार्गी लागणार असल्याचे आ.कानडे म्हणाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, माजी नगराध्यक्ष संजय फ़ंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, माजी नगरसेवक आशिष धनवटे उपस्थित होते. यावेळी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
शहरातील रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा करणार : आ.कानडे
शहरातील अमरधाम समोरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी आमदार लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह नगरसेवकांनी रस्त्यावर झालेल्या चिखलात बैठक मांडत, घोषणाबाजी करत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध केला.