साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 जून 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर शहरातील गोंधवनी परिसरात 18 जूनला कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे गोंधवनी रस्ता परिसर 200 मीटर पूर्णपणे सील केला असून, या परिसरातील मुख्य रस्ता हा पूर्णपणे बंद केलेला असल्याने होणारी गैरसोय थांबावी म्हणून लवकरात लवकर गोंधवनी रोड हा जुना राज्यमार्ग म्हणून त्वरित चालू करावा, अशी मागणी नगरसेविका प्रणिती दिपक चव्हाण व खादी ग्रामोद्योगचे संचालक दिपक चरणदादा चव्हाण यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, रेड झोन असल्यामुळे परिसरातील सर्वच दुकाने 100 % बंद आहेत. अगोदरच गेल्या तीनचार महिन्यापासून लोकडाऊन परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन त्रस्त झालेले असून उपासमारीची वेळ आली आहे. या भागात वास्तव्य करणारा बहुसंख्य वर्ग हा हातावर पोट भरणारा आहे. परिसरातील सर्वच दुकाने बंद असल्याने उधारीवरती नागरिकांचा जो उदरनिर्वाह चालत होता, तोही पूर्णपणे ठप्प झाला असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
सकाळ संध्याकाळ एक - एक तास तरी जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने चालू ठेवावी..
गेल्या पाच सहा दिवसांपासून नागरिकांचे हाल होत असून स्थानिक प्रशासन, आमदार, नगराध्यक्षा, प्रांत, तहसीलदार यांनी लक्ष घालून किमान या रेड झोन परिसरात सकाळ व संध्याकाळी एक-एक तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवावीत, जेणेकरून स्थानिक नागरिकांची उपासमार थांबेल.
पूर्ण गोंधवनी रोड नव्हे तर फक्त रहिवासी क्षेत्रातील रस्ते बंद करावे...
रेड झोन असल्यामुळे प्रशासनाने फक्त रहिवासी क्षेत्रातील विविध रस्ते बंद करावयास हवे होते ; परंतु राज्यमार्ग असलेला गोंधवनी रोड हा मुख्य रस्ताच बंद केल्या कारणाने शहरातील दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची त्याचबरोबर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचीदेखील जाणेयेणे कमी ससेहोलपट होत आहे. त्यामुळे, परिसरातील गोंधवनी रोड हा मुख्य रस्ता किमान एक बाजू तरी चालू ठेवावा, अशी मागणी गोंधवनी रस्ता परिसरातील नागरिकांनी केली आहे.