साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 मे 2020
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) शहरातील गाजलेल्या घनकचरा व्यवस्थापन ठेका वाढीव ८ लाख ₹ जास्त रकमेने सद्गुरू बहूउद्देशीय संस्था, तळोदा, जि.नंदुरबार यांना देण्याचा सत्ताधारी गटाचा ठराव सर्वपक्षीय नगरसेवकांनी अमान्य करत हाणून पाडला. विशिष्ट नगरसेवक पोसण्याचा ठेका बहुमताने नामंजूर करण्यात आल्याने नगराध्यक्षा अनुराधा आदिक या विषयात अल्पमतात आल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे.
नगरपालिकेने शहरात घनकचरा व्यवस्थापन ठेका २३ लाख रुपयांना प्रति महिना दिशा एजन्सीला दिला होता. कामाची मुदत संपल्यावर निघालेल्या नवीन निविदा प्रक्रियेत सद्गुरू बहूउद्देशीय संस्थेला सदर ठेका ३२ लाख रुपयांना देण्यात यावा म्हणून विशेष सभा आयोजित केली. सर्क्युलरनुसार नगरसेवकांच्या घरी जाऊन निविदा मान्य अथवा निगोसियशन असा कॉलम ठेवण्यात आला.
सत्ताधारी गटातील नगरसेवक दीपक बाळासाहेब चव्हाण, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, नगरसेविका स्नेहल केतन खोरे, वैशाली दीपक चव्हाण, शीतल आबासाहेब गवारे या सहा नगरसेवकांनी वाढीव रकमेच्या ठेक्याला विरोध नोंदविणे ही शहरवासीयांसाठी जमेची बाजू ठरली.
नगरसेविका भारती कांबळे, किरण लुणिया यांच्यासह विरोधी गटाचे उपाध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, भारती परदेशी, मीरा रोटे, आशा रासकर, मनोज लबडे शेख गटाचे अंजुम शेख, राजेश अलघ, ताराचंद रणदिवे, जायदाबी कुरेशी, समीना शेख, जयश्री शेळके यांनी वाढीव रकमेला केलेला कडाडून विरोधाचे जनतेने स्वागत केले आहे. तर नगराध्यक्षा अनुराधा आदिक, बाळासाहेब गांगड, शामलिंग शिंदे, प्रकाश ढोकणे, राजेंद्र पवार, अक्सा अल्तमश पटेल, मुख्तार शाह, प्रणिती दीपक चव्हाण, रवी पाटील, निलोफर महंमद शेख, तरन्नुम रईस जहागिरदार, चंद्रकला डोळस यांनी वाढीव रकमेच्या ठेक्यास "निगोसियशन" कॉलममध्ये सह्या करून एकप्रकारे वाढीव रकमेच्या ठेक्यास समर्थन केल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे सध्याचा ठेकेदार २३ लाख रुपयांच्या ठेक्यात १४ खाजगी घंटागाड्या व ८ खाजगी ट्रॅक्टर यांचे भाडे अदा करतो तर नवीन वाढीव रकमेच्या ठेक्यात ३२ लाख रुपये व नगरपालिकेच्या मालकीच्या घंटागाड्यांची अधिकची भाडे रक्कम २ लाख रुपये अधिक म्हणजे ३४ लाख रुपयांमध्ये ठेका देण्याचा डाव जागरूक नगरसेवकांनी उधळून लावला. ही वाढीव रक्कम नेमकी कोणाच्या घशात घालायची ? हा संतप्त सवाल भाजयुमोचे अक्षय वर्पे यांनी आधीच विचारला होता.
सत्ताधारी गटातील नगरसेवक दीपक चव्हाण, शीतल गवारे, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, वैशाली चव्हाण, स्नेहल खोरे या आमच्या सहा नगरसेवकांनी वाढीव रकमेच्या घनकचरा ठेक्यास विरोध करत जनहिताची भूमिका घेतली. सत्ताधारी गटात असलो तरी कोणत्याही दबावाखाली न येता चुकीच्या विषयाला विरोध करण्याचे धाडस आमच्या सहकाऱ्यांमध्ये असल्याची प्रतिक्रिया मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली.