साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 मे, 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी | तालुक्यात अनेक गावांच्या गावतळ्यातील पाण्याने तळ गाठला आहे त्यामुळे शेतीच्या चालू असलेल्या दुसऱ्या उन्हाळी आवर्तनातुन शेतीचे भरणे झाल्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील गावतळे भरुन देण्याची मागणी करण ससाणे यांनी केली आहे.
सध्या शेतीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सुरु आहे शेतकऱ्यांचे शेतीचे भरणे झाल्यानंतर लगेचच गावतळ्यात पाणी सोडणे गरजेचे आहे.अनेक गावांतील तळ्यांनी तळ गाठल्याने पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडण्याची शक्यता आहे त्यामुळे गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांनी प्रयत्न करुन उन्हाळ्यात चालू असलेल्या शेतीच्या आवर्तनातून चाऱ्या व वॉटर कोर्सवरील गावतळे भरुन घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानग्या घेऊन त्या त्या गावचे तळे भरुन घेतले आहेत. ज्या गावं तळ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आहे आणि ज्या गावतळ्यांना जिल्हाधिकारी यांची मान्यता नाही परंतू जे गावंतळे भरणे शक्य आहे आश्या गावंतळ्यात देखील पाणी सोडावे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने तळ्यांनी तळ गाठल्याने संबंधित गावातील गावकऱ्यांनी गावतळ्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणात मुबलक पाणी साठा असल्याने सध्या चालू असलेल्या शेतीच्या उन्हाळी आवर्तनातून चाऱ्या व वॉटरकोर्स वरील गावतळे भरण्यासाठी पाणी सोडणे शक्य होईल. त्यामुळे चालू शेतीच्या उन्हाळी आवर्तनातून शेतकऱ्यांचे भरणे पूर्णपणे झाल्यानंतर चाऱ्या व वॉटरकोर्स वरील गावंतळ्यात पाणी सोडण्याची मागणी ससाणे यांनी केली आहे. हीच मागणी ससाणे यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे आणि आमदार लहू कानडे यांच्याकडे केली आहे.