( देवीदास देसाई / भरत थोरात )
बेलापूर | उक्कलगाव | कोरोनाच्या धास्तीमुळे चिंतामणी- कुलथे परिवारांचा शुभविवाह केवळ दहा पाहुण्याच्या उपस्थितीत... ना मांडव....ना बँण्डबाजा....ना गाजावाजा....अशा पध्दतीने लिंबाच्या झाडाखाली संपन्न झाला.
बेलापूर येथील भगीरथ चिंतामणी यांचे चिरंजीव योगेश व बुरुडगाव अहमदनगर येथील ज्ञानेश्वर विठ्ठल कुलथे यांची मुलगी प्रज्ञा हीच्याशी निश्चित झाला होता. विवाहची तारीख १५ एप्रिल धरण्यात आली होती ; परतु लाॅक डाऊनमुळे विवाह करणे अशक्य झाले होते. लाॅकडाऊन वाढतच चालला होता. अखेर ज्ञानेश्वर कुलथे व भगीरथ चिंतामणी यांनी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याची तयारी दर्शविली. या करीता पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्याकडे परवानगी मागितली. पोलीस अधिकार्यानी काही मोजक्याच लोकाच्या उपस्थितीत विवाह करण्याच्या अटीवर परवानगी दिली. मग काय ना मांडव... ना बॅडबाजा... ना वरात...केवळ दहा पाहुण्याच्या उपस्थितीत लिंबाच्या झाडाखाली प्रज्ञा व योगेश यांचा विवाह संपन्न झाला.
या वेळी कुलथे व चिंतामणी परिवाराचे केवळ तीन ते चार हजार रुपयेच खर्च झाले. या बाबत नवरदेव योगेश व नववधु प्रज्ञा यांनी अशी भावना व्यक्त केली की, आपण खोट्या प्रतिष्ठेपायी मोठेपणा दाखविण्याच्या नादात कर्जबाजारी होवुन लग्न करतो. लग्नात अनावश्यक खर्च करतो . पैशाची अन अन्नाचीही उधळपट्टी करतो. परंतु कोरोनाच्या संकटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबाचा फार मोठा खर्च वाचला जो आमच्या भावी जीवनासाठी वरदान ठरु शकतो. अशा प्रकारे विवाह करुन लग्नाचा फालतु होणारा खर्च आम्ही निश्चितच चांगल्या कार्याला लावु, त्यामुळे दोन कुटुंबाचे हे नाते अधिक घट्ट होणार आहे.