साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 मे 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी | येथील बसस्थानकावरील मानवता चॅरिटेबल ट्रस्टाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या पाणपोईच्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दानपेटी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने एस.टी.महमंडळाच्या बसेसही बंद आहे. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट आहे. याठिकाणी असलेली मानवता चॅरिटेबल ट्रस्टची पाणपोईही बंद आहे.
याठिकाणी ट्रस्टची छोटी खोलीही आहे. याठिकाणी पाणी पिण्यासाठी येणाऱ्यांकडून दान मिळत असे, त्यासाठी येथे दानपेटी ठेवण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे ही दानपेटी येथील खोलीत ठेवली होती. दोन दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरची खोलीचा दरवाजा उघडून आत ठेवलेली दानपेटी चोरून नेली. ट्रस्टचे अध्यक्ष जनकभाई आशर यांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली.
याबाबत त्याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन चालू असल्याने पोलिसांवरती अगोदरच ताण आहे. त्यात आपली दानपेटी चोरीला गेली हे सांगणे योग्य वाटले नाही. यामुळे याची कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही.
शहरात मानवता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यापूर्वी मोठमोठी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यात सहभागी होणाऱ्या शिबीरार्थींकडून कुठलाही मोबदला घेतला जात नव्हता. आलेल्या शिबीरार्थींची राहण्याची, जेवणाची तसेच औषधोपचाराची मोफत व्यवस्था केली जात असे. जनकभाई आशर यांच्या या कार्यामुळे ते राज्यभर लौकिक आहे.
आता वयोमानामुळे ते शिबीरे घेत नाहीत. मात्र, पाणपोई चालवितात. बसस्थानकावरील ही पाणपोेई प्रसिद्ध होती. याठिकाणाहून नागरिक पिण्यासाठी पाणी नेतात. आजच्या या घटनेने अनेकांनी खेद व्यक्त केला.