Shrirampur : घनकचरा ठेक्यात लाखोंची वाढ कोणाच्या सांगण्यावरून ? सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध करून डाव हाणून पाडावा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मे 2020
श्रीरामपूर | घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात तब्बल ९ लाख रुपयांची वाढ करून २३ लाखांचा ठेका ३२ लाखांना देण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन करत आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा डाव हाणून पाडावा. जनतेच्या पैशावर दिवसा ढवळ्या डल्ला मारण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतंय ? असा संतप्त सवाल भाजपचे अक्षय वर्पे यांनी केला आहे.


          याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपालिका आधीच कचरा उचलणे, साफसफाई करणे, स्वच्छता राखणेबाबत संपूर्ण अपयशी ठरली आहे. त्यातच दोन वर्षांपूर्वी प्रति महिना १६ लाखांचा ठेका २३ लाखांना देऊन पण शहरात स्वच्छतेची बोंबाबोंब झाली. उद्या होणाऱ्या विशेष सभेत घनकचरा व्यवस्थापन ठेका फायनल केला जाणार आहे. त्यात हा ठेका २३ लाख रुपये प्रति महिन्यावरून ३२ लाख रुपये प्रति महिना देण्याचे फायनल केले असल्याचे समजते. सर्व नगरसेवकांनी हा डाव उलथवणे गरजेचे आहे. जे विरोध करणार नाही त्यावरून नेमके जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे कोण ? हे उघडे पडणार असल्याचे मत अक्षय वर्पे यांनी व्यक्त केले आहे.


      साफसफाई ठेक्याबाबत जनतेची नाराजी असतानाच नगरपालिका प्रशासन हुकूमशाही पद्धतीने ही लूट करणार असेल तर भाजप त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असे भाजपाचे नेते गणेश राठी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कडूसरकर, माजी अध्यक्ष मारुती बिंगले, बाळासाहेब अहिरे, विलास थोरात, अक्षय वर्पे, विशाल यादव, रवि पंडित, अक्षय नागरे, निलेश जगताप, अमोल अंबिलवादे यांनी म्हटले आहे.


जनतेचा भ्रमनिरास, कर्मचाऱ्यांची पिळवणूक आणि ठेकेदाराचा लाभ असा घनकचरा व्यवस्थापन ठेका अजब आहे. स्वच्छतेच्या कामाबाबत अनेक तक्रारी असून नागरिकांसह अनेक नगरसेवकांमध्ये असंतोष आहे. २३ लाख रुपयात काम समाधानकारक नसताना सदर ठेका तब्बल ८ लाख ८४ हजार ३७० रुपयांनी वाढवून ३२ लाखांना देणे अयोग्य आहे. 
                  -सौ.स्नेहल केतन खोरे,
                   सदस्या,  जिल्हा नियोजन समिती. 
नगरसेविका - श्रीरामपूर नगरपरिषद

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post