साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मे 2020
श्रीरामपूर | कोरोना महामारीत अहोरात्र स्वच्छतेचे काम करून शहराचे आरोग्य चांगले ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा काही नगरसेवकांनी व नागरिकांनी सत्कार केला. मात्र दुसऱीकडे त्याच कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळवूण देणाऱ्या पालिकेच्या नवीन ठेक्यास विरोध का केला जात आहे, असा सवाल श्रमिक महासंघाचे सरचिटणीस कॉ. जीवन सुरूडे यांनी केला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सुरूडे यांनी म्हटले आहे की, नगर परिषदेने गेल्या वेळी पुणे येथील दिशा एजन्सीला २२ लाख ९८ हजार ६५१ प्रतिमहिनाप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका दिला होता. आता तोच ठेका नवीन निविदा प्रक्रियेनुसार सुमारे ११ लाख रुपयांनी वाढवून देण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. मात्र हा ठराव पालिकेत मांडण्यापूर्वीच सोशल मिडिया व वर्तमानपत्रातून त्यास विरोध सुरू झाला.
विरोधी नगरसेवक व सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. या सर्व गोंधळात बहुमताने हा ठराव फेटाळण्यात आला. त्यात प्रामुख्याने खत निर्मितीसाठी वाढवलेली ६ लाख व पालिकेच्या गाड्यांपोटीचा २ लाखांचा परतावा यास नगरसेवकांनी विरोध केला.
वास्तविक पाहता नगरसेवकांच्या या मुद्द्यांना संघटनेचा विरोध नाही किंबहुना त्यास पाठींबा देत नाही. मात्र ठेका वाढवून दिल्याने एक सकारात्मक बाब घडणार होती. ती म्हणजे शहराच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांकडून मिळाले होते.
परंतु विरोधामुळे कर्मचाऱ्यांच्या या स्वप्नावर पाणी फेरले जाणार आहे.
राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना शहरातील पालिका स्वच्छता कर्मचारी आपले व आपल्या कुटुंबियांचे आरोग्य तळहातावर ठेवून अहोरात्र झटत होते.
इतर शहरांच्या तुलनेत शहरात एकही रूग्ण आढळला नाही. याचे श्रेय खरे तर आरोग्य कर्मचारी, पोलिस प्रशासन, महसूल यांच्यासह पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिले पाहिजे. त्यावेळी पालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व शहरातील सुज्ञ नागरिकांनी कर्मचाऱ्यांचा सत्कारही केला.
गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेले असतानाही आज त्याच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना हातभार लावण्यासाठी मिळणारी वेतनवाढ या ठेक्यास केलेल्या विरोधामुळे डावलली जाणार आहे. अशा वेळी ते सुज्ञ नागरिक व सत्कार करणारे पदाधिकारी मूग गिळून का बसले आहेत?
ठरावाच्या विरोधासाठी अनेक नगरसेवकांनी पालिकेला पत्र दिले. वाढीव रक्कमेचा विरोध संघटना समजू शकते. मात्र एकाही नगरसेवकाने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत ब्र देखील काढला नाही.
त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे बहुतांशी नगरसेवकांना निवेदनाद्वारे संघटनेने याबाबत आधीच जागृत केले होते. तरीही सर्वांनी कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली नाही.
आज कर्मचाऱ्यांची बाजू घेत नसले तरी आपली खासगी कामे सांगताना एकही नगरसेवक मागेपुढे पाहत नाही. अनेकदा कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त नगरसेवकांच्या खासगी कामांसाठी कर्मचारी कुठलीही तक्रार न करता राबत असतो. तरीही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे. जुन्याच किमतीत ठेका द्यावा असे म्हणणाऱ्या नगरसेवकांनी सफाई कामगारांच्या वेतनवाढीचे काय, या प्रश्नांचे उत्तर द्यावे, असे पत्रकात म्हटले आहे.
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी यापूर्वीही कर्मचाऱ्यांची वेतनवाढ करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या दोन महिन्यात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची दखल घेत या वाढीव ठेक्यानंतर आणखी सन्मानजनक वेतनवाढ देण्याचा शब्द त्यांनी संघटनेस दिला आहे.त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र हा ठराव फेटाळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. यानंतरही वेतनवाढ मिळाली नाही तर कर्मचाऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल, असा इशारा कॉ.जीवन सुरूडे यांनी दिला आहे.