साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 मे 2020
टिळकनगर (वार्ताहर) लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर टिळकनगर, दत्तनगर, एकलहरे, रांजणखोल, खंडाळा तसेच लगतच्या वाड्यावस्त्यावरील मुस्लिम बांधवांनी महिनाभर रोजे करून सश्रध्द भावनेने अल्लाहची ‘इबादत’ केल्यानंतर ईद-ऊल-फितर (रमजान ईद) यंदा ईदगाह व मशिदीमध्ये न जाता घरोघरी नमाज पठण करून साजरी केली. तसेच हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांवर सोशल मीडिया, दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षांव केला. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टिळकनगर परिसरातील लहान चिमुरड्याने सोशल डिस्टन्स ठेऊन रमजान ईदची नमाज पठण केल्याचे दिसून आले परिसरात दरवर्षी पवित्र रमजान ईद हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यंदाची ईद ही खऱ्या अर्थाने गरजूंना मदत करणारी ईद ठरली. तालुक्यात लॉकडाऊन शिथिल होऊन दुकाने उघडण्यास परवानगी मिळालेली असताना देखील दरवर्षीच्या तुलनेत यंदा मुस्लीम बांधवांचा नवे कपडे व इतर वस्तू खरेदी करण्यात उत्साह दिसून आला नाही.
यंदाची ईद हे नवीन कपडे खरेदी न करता गरजूंना मदत करुन साजरी केल्याचे निदर्शनास आले. गेले महिनाभर रमजानचे रोजे करून मुस्लिम कुटुंबीयांनी अल्लाह व त्यांचे प्रेषित मोहम्मद पैगंबरांविषयी श्रध्दा प्रकट केली. महिनाभर प्रार्थना व नमाजपठणात मग्न झाल्यानंतर संपूर्ण महिन्याचे रोजे कसे संपले हे कळलेसुध्दा नाही. शेवटी रमजान ईदचे वेध लागले तेव्हा या पवित्र महिन्याला निरोप देताना सर्वाच्या भावना उचंबळून आल्या होत्या. रमजान महिन्याच्या अखेरच्या पर्वात काही हिंदू कुटुंबीयांनीही रोजे करून सुखानुभव घेतला.