साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 मे, 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी | सध्या कोरोना आजाराने सर्वत्र थैमान घातले असून संचारबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे याचा फटका गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे त्यामुळे मुळा प्रवरा विज संस्थेच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, राहुरी व राहता तालुक्यातील गोरगरीब जनतेला मदत करण्याची मागणी मुळा प्रवरा विज संस्थेचे संचालक आणि श्रीरामपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय छल्लारे यांनी केले आहे.
मुळा प्रवरा वीज संस्थेच्या वतीने चेअरमन खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतीच पंतप्रधान सहायता निधीला पंचवीस लाखांची मदत केली आहे याबद्दल त्यांचे आभारी आहे. मुळा प्रवरा विज संस्थेने पंतप्रधान सहायता निधीला मोठी आर्थिक मदत केली आहे त्याचा धर्तीवर संस्थेच्या कार्यक्षेत्रात मदत करण्याची मागणी छल्लारे यांनी केली आहे.
मुळा प्रवरा वीज संस्थेच्या कार्यक्षेत्रात गोरगरीब जनतेला मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. श्रीरामपूर, राहुरी आणि राहता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने आजवर मुळा प्रवरा विज संस्थेला अडचणीच्या काळात मदतच केली आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील गोर गरीब जनतेला आजच्या अडचणीच्या काळात मदत करणे, ही आपली जबाबदारी असल्याचे छल्लारे यांनी म्हटले आहे.
आपण केलेली मागणी सर्वसामान्य जनतेसाठी असल्याने संस्थेचे चेअरमन खासदार डॉ.सुजय विखे पाटील ही मागणी नक्कीच पूर्ण करुन मुळा प्रवरा वीज संस्थेच्या कार्यक्षेत्रातील श्रीरामपूर, राहुरी व राहता तालुक्यातील कामगार, सभासद आणि गोर गरीब जनतेला न्याय देतील असा विश्वास छल्लारे यांनी व्यक्त केला आहे.