Shrirampur : व्यापारी व नागरिकांच्या असहकार्यामुळे श्रीरामपूरची बाजारपेठ बंद करण्याचा आदेश

साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 मे 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) बावन्न दिवस बंद असलेली श्रीरामपूरची बाजारपेठ व्यापारी असोसिएशन व नागरिकांच्या दबावामुळे 13 मे पासून सुरू करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला. या निर्णयाचे पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात स्वागतही झाले. परंतु सामाजिक अंतराचे भान न ठेवता  वाढलेली गर्दी, नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे असहकार्य यामुळे सदरची बाजारपेठ उद्यापासून पुन्हा बंद करण्याचा आदेश तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे .

        याबाबत तहसील कार्यालयातून दिलेल्या आदेशात म्हटले आहे कि, श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रस्तावानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने काही अटी व शर्ती सह सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली होती. मात्र गेल्या चार दिवसांमध्ये शहरात वाढलेली गर्दी, कलम 144 चे होणारे उल्लंघन, नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे एकमेकाला नसलेले सहकार्य व त्यातून कोरोना विषाणू फैलावण्याचा धोका उद्भवण्याची निर्माण झालेली परिस्थिती पाहता ही दुकाने चालू करण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात येत असून फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.इतर दुकाने बंद करावी. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी असे ही तहसीलदारांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.


         याबाबत अधिक माहिती घेतली असता व्यापारी असोसिएशनच्या मागणीवरून व विविध स्तरांतून आलेल्या दबावापोटी नगरपालिकेने बुधवार 13 मे पासून शहराच्या बाजारपेठेतील दुकाने दिवसाआड दिशा बदलून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी सर्वांनी चांगले सहकार्य केले. मात्र दुसऱ्या दिवसापासून प्रत्येकाने मनमानी सुरू केली. यातून नगरपालिकेने निर्माण केलेल्या कर्मचाऱ्यांची पथके आणि नागरिक व व्यापारी यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले होते. मास्क वापरणे आवश्यक असल्याने पालिकेचे कर्मचारी नागरिकांना मास्क वापरण्याबाबत विनंती करीत होते. एक-दोन ठिकाणी मारामाऱ्या पर्यंतचे प्रसंग उद्भवले. त्यामुळे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काल शनिवारी सकाळी नगरपालिकेत मुख्याधिकारी समीर शेख यांची भेट घेऊन सदर कामाबाबत येत असलेल्या अडचणींचा पाढा वाचला. पथकासोबत पोलिस बंदोबस्त दिला तरच आम्ही हे काम करू शकतो असे सांगितले. मात्र मुख्याधिकारी शेख यांनी असे प्रसंग चालूच राहणार आहेत. त्याबाबत आपण फारसे मनाला लावून न घेता आपलं कर्तव्य पार पाडावे. गरज पडल्यास पोलिसांचा बंदोबस्त देखील उपलब्ध करून दिला जाईल. अशी कर्मचाऱ्यांची समजूत घातली होती. मात्र तीन दिवसापासून आलेल्या अनुभवामुळे कर्मचाऱ्यांची ही बाजारपेठेमध्ये काम करण्याची  अनिच्छा होती. प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याकडे सुद्धा जनतेच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात गेल्या होत्या. किराणा, मोबाईल, कपडे विक्रीच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होती. लोकांना सांगून ही सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. अनेक व्यापाऱ्यांनी घालून दिलेले नियम व अटी पायदळी तुडवल्या होत्या. एखादा अपवाद वगळता सैनिटायझर ची कोणतीही व्यवस्था व्यापाऱ्यांनी केलेली नव्हती.त्यामुळे बाजारपेठ उघडून पश्चाताप झाल्याची भावना प्रशासनातील अधिकारी सुद्धा व्यक्त करीत होते. गेले बावन्न दिवस लॉक डाऊन मध्ये परिस्थिती अत्यंत कुशलतेने हाताळून प्रांत अधिकारी पवार, तहसीलदार पाटील, पोलीस निरीक्षक बहिरट यांनी श्रीरामपूरकरांचे संरक्षण केले होते. बाजारपेठ उघडल्यामुळे ग्राहकांपेक्षा मोकाट फिरणाऱ्याच्याच गर्दीत वाढ झाल्याचे दिसत होते. काही ठिकाणी रस्ते मोकळे केले तर काही ठिकाणी मुद्दाम बंद केले होते. त्यामुळे देखील नागरिकांमध्ये असंतोष पसरला होता . या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अखेर बाजारपेठ पूर्ववत बंद करण्याचा निर्णय घेतला. तसे आदेश नगरपालिकेला बजावले . त्यानुसार रविवारी शहरांमध्ये नगरपालिकेतर्फे जनता कर्फ्यू पाळला जात असल्यामुळे  शहर बंदच राहणार आहे . सोमवारपासून पूर्वीप्रमाणे फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे राहतील . ठिक ठिकाणी सुरू केलेले रस्ते सुद्धा आता बंद करण्यात येतील. एकंदरीत आलेल्या अनुभवातून वेळीच खबरदारी घेऊन तहसिलदारांनी बाजारपेठेतील दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याबद्दल शहरातील सर्व थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .
नगरपालिकेने चार दिवसापूर्वी बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेतला तरी वार्ड नंबर 2 मधील शहराला जोडणारे रस्ते सय्यद बाबा चौक, बाफना पथ, दशमेश नगर चौक, डॉक्टर अजीज पथ ,मौलाना आझाद चौक याठिकाणी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथील नागरिकांना आपल्या दैनंदिन कामासाठी शहरात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. याबाबत वर्तमानपत्र तसेच प्रशासनाकडे मागणी करून देखील प्रशासनाने जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष करून वार्ड नंबर 2 मध्ये एक प्रकारची अघोषित संचारबंदी लागू केली होती . त्यामुळे या भागातील जनतेमध्ये मोठा असंतोष पसरला होता . परंतु आता पुन्हा बाजारपेठ बंद झाल्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला असून आता जेव्हा केव्हा बाजारपेठ सुरू होईल तेव्हा सय्यद बाबा चौकातील अडथळे सुद्धा काढण्यात आले पाहिजे अशी मागणी वार्ड नंबर 2 तसेच गोंधवणी रोड, गोंधवणी गाव, मिल्लत नगर, संजय नगर या भागातील नागरिकांनी केली आहे .

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post