साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 मे 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | 'गुगल पे' वरून ऑनलाईन व्यवहार करताना तांत्रिक अडचणीमुळे पैसे अडकले. त्यानंतर चुकून चुकीच्या ग्राहक क्रमांकाला फोन लागल्यानंतर समोरून बँकेची प्राथमिक माहिती, ओटीपी मागवून बँक खात्यातून 5 हजार रुपये काढून घेतल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील एका बँक खातेदाराच्या बाबतीत रविवारी (दि.17) घडली.
उक्कलगाव येथील रवींद्र थोरात यांनी मोबाईलव्दारे 'गुगल-पे'वरुन व्यवहार केला ; परंतु व्यवहार पूर्ण न होता तांत्रिक अडचणीमुळे त्याचे पैसे अडकले. त्यांनतर त्यांनी पैसे मिळण्यासाठी ग्राहक क्रमांकावर संपर्क साधला. त्यांच्याकडुन चुकीच्या क्रमांकाला फोन लागला असता समोरून त्यांच्या बॅकखात्याची प्राथमिक माहिती, ओटीपी मागवून खात्यातून पाच हजारांना गंडा घातला. त्यांची फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी बॅक अधिकाऱ्यांशी संपर्क केला. याबाबतच बॅक अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती देऊन व्यवहार बंद केले. याप्रकरणी नगर सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे समजते.