Eid : श्रीरामपुरात सादगीने ईद साजरी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 मे 2020
श्रीरामपूर | प्रतिनिधी |जगभरातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा असलेला रमजान ईदचा सण  शहर व परिसरामध्ये यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

              दरवर्षी दिसणारा नवीन कपड्यांचा झगमगाट यावर्षी कुठे दिसला नाही. ईदगाह आणि मशीद मध्ये नमाज साठी परवानगी नसल्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी भल्या सकाळीच आपल्या घरात आणि गटांमध्ये ईद निमित्ताने नमाज पठण केले. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षी जामा मशीद आणि ईदगाह मध्ये होणारी पुढाऱ्यांची गर्दी या वर्षी होऊ शकली नाही.

            मात्र आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे,मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, लकी सेठी, अशोक उपाध्ये, राजू सोनवणे, हेमंत ओगले,रवींद्र गुलाटी यांच्यासह इतर मान्यवरांनी आपल्या मुस्लिम बांधवांना फोन करून व व्हाट्सअप मेसेज द्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने शहरांमध्ये सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुस्लिम बांधवांनी अत्यंत साधेपणाने यावर्षी ईद साजरी करून एक आदर्श निर्माण केला. तत्पूर्वी रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्‍यानंतर ईदच्या तयारीने वेग घेतला होता. अनेक मुस्लीम तरुण मंडळांनी शहरातील गरजू लोकांची यादी करून त्यांना शीरखुर्मा चा सामान मदत म्हणून पोहोच केला.त्यामुळे गोरगरिबांना घरात शीरखुर्माचा आस्वाद घेता आला. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post