साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 मे 2020
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) विविध भाषा ,जाती, धर्म, पंथ यांनी नटलेल्या आपल्या या देशांमध्ये सर्व सामाजिक घटकांना योग्य ते स्थान देऊन सामाजिक ऐक्य साधण्याचे मोठे काम दैनिक सार्वमत ने केलेले आहे. सार्वमत रमजान लेखमाला हे त्याचे उत्तम उदाहरण आहे .सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये सार्वमत चे खूप मोलाचे योगदान आहे असे प्रतिपादन अमानत नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, माजी नगरसेवक हाजी याकूबभाई बागवान यांनी केले.
दैनिक सार्वमत मध्ये गेली २३ वर्षे रमजानुल मुबारक या लेखमालेचे माध्यमातून इस्लाम धर्माची तत्वे आणि शिकवण यांची माहिती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणारे लेखक सलीमखान पठाण यांचा अमानत नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सार्वमत लेखमालेबद्दल सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी याकुबभाई बागवान बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सार्वमतचे वृत्त संपादक अशोकराव गाडेकर, अमानत पतसंस्थेचे चेअरमन वसंतलाल भंडारी, व्हाईस चेअरमन साजिद मिर्झा, तज्ञ संचालक शकील बागवान, संचालक इब्राहीम कुरेशी, सलीम काकर, शाखाधिकारी गयासुद्दीन तांबोळी व पतसंस्थेचा स्टाफ उपस्थित होता.
याकूबभाई बागवान पुढे म्हणाले की सलीमखान पठाण यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून दैनिक सार्वमत मार्फत एक अतिशय चांगला उपक्रम सर्व समाजासाठी चालविला. यामध्ये सार्वमतची खूप महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य भूषणावह आहे. शहराच्या विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे. एक समाजप्रिय व्यक्ती म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.म्हणूनच आमच्या पत संस्थेने त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला.
तज्ञ संचालक शकील बागवान यांनी प्रस्ताविक भाषणामध्ये सार्वमत व सलीमखान पठाण यांच्या बद्दलची माहिती दिली. याप्रसंगी श्री पठाण यांचा शाल, गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वृत्तसंपादक गाडेकर यांनी सार्वमत हे समाजाच्या सुख-दुःखाशी एकरूप झालेले वृत्तपत्र असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका आणि जबाबदारी सार्वमत पार पाडीत आहे असे सांगितले. मालिकेचे लेखक सलीमखान पठाण यांनी दैनिक सार्वमत ने संधी दिल्यामुळे ही मालिका लिहिता आली असे सांगून महाराष्ट्रातील एका वृत्तपत्रामध्ये सलग तेवीस वर्षे चालणारी ही एकमेव लेखमाला ठरली आहे. आज तिचे लाखो वाचक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि गावात आहेत. याचे सर्व श्रेय दैनिक सार्वमतला असल्याचे सांगितले.अमानत पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन साजिद मिर्झा यांनी शेवटी आभार मानले.