साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 मे, 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या धास्तीने नागरीक घरात बसलेले असताना काही जण आजही करणी चेटूक करत असुन ऐनतपूर येथील नवले वस्तीवरील रस्त्यावर आढळून आलेल्या टाचणी सुया काटे टोचलेल्या लिंबु वांग्यामुळे खळबळ उडाली आहे.
बेलापूर ऐनतपूर शिवारात असलेल्या नवले वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुणीतरी अज्ञात इसमाने शनिवारी रात्रीच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांच्या घराच्या पाठीमागे तसेच नवले वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वांगे लिंबु, त्यास टाचण्या खिळे काटे टोचुन टाकलेले आढळून आले.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असुन कुणीतरी या परिसरात दहशत पसारविण्याच्या उद्देशाने हा खोडसळपणा केलेला असण्याची दाट शक्यता आहे.
पूर्वी हे प्रकार करताना लिंबाचा वापर केला जात असे परंतु आता भोंदुबाबांनी त्यात प्रगती केली असुन लिंबा बरोबरच वाग्यांचाही वापर सुरु केलेला दिसतो. आज विज्ञानाने इतकी प्रगती केलेली असतानाही लोकांच्या मानगुटीवर बसलेले अंधश्रध्देचे भूत अजुनही उतरु शकलेले नाही, या कृत्यावरुन हेच सिध्द होत आहे.
या परिसरात पुजा पाठ करुन सर्व सामान्य नागरीकात दहशत पसरविणाऱ्या भोंदु बाबाचा बंदोबस्त करण्याची मागणी या परिसरातील नागरीकांनी केली आहे.