साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मे 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या शाळा , समाजमंदिरे , धर्मशाळा आदि ठिकाणी क्वारंटाइन असलेल्या बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची जेवन, पिण्याचे पाणी , लाईट व स्वच्छतेसंबंंधी हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत असताना बेलापूर खुर्द येथील हरिहर केशव गोविंद विद्यालयात क्वारंटाइन असलेल्या नागरिकांची क्वारंटाइन कक्षाची स्वच्छता करून , स्वच्छतेमध्येच आरोग्य असते हा संदेश दिला.
नाशिक , छत्तीसगड , अहमदाबाद , इंदापूर साखर कारखाना या ठिकाणी नोकरीनिमित्त गेलेले बेलापूर खुर्द येथील योगेश अशोक पुजारी , अमोल हरिभाऊ साबळे , प्रवीण वसंत पुजारी , रामेश्वर गोकूळ शिंदे , अभिषेक केशव गायकवाड , विद्यानंद दशरथ पुजारी हे युवक लॉकडाऊनमुळे पुन्हा गावात आले . त्यांना येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या हरिहर केशव गोविंद विद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले . क्वारंटाइन काळातील वेळेचा सदुपयोग करीत या युवकांनी शाळेचा परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला . गावच्या कोरोना समितीने त्यास संमती दिली. शाळेला सुटी असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साचला होता .या युवकांनी तो झाडून साफ केला. त्याचप्रमाणे झाडांची छाटणी , झाडांना पाणी घालणे , झाडांच्या बुंध्यांना रंग देणे , वर्ग खोल्या व स्वच्छता गृहाची सफाई करून अगळावेगळा आदर्श घालवून दिला. ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेची सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली . कोरोना समितीने त्यांना या कामी रंग आदि साहित्य पुरवले .
आजच्या गंभीर परिस्थितीत या युवकांनी दाखविलेल्या सामाजिक भानाबद्दल सरपंचा अनुराधा गाढे , वैद्यकीय अधिकारी डॉ.देविदास चोखर, ग्रामसेवक तुंबारे , कामगार तलाठी विकास शिंदे , आरोग्य सेवक , तानाजी गडाख , आरोग्य सेविका , के. एस. बाचकर , पो.पा. युवराज जोशी , पो.पा. उमेश बारहाते , विकी जाधव , सुनिल बारहाते आदिंनी कोतुक केले.