साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 मे 2020
श्रीरामपूर | तालुका फळरोपवाटिका पुणतांबा ता. राहाता व काष्टी ता. श्रीगोंदा येथील फळरोप वाटिकेतील रोजंदारी कामगारांचे ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२० असे तब्बल ७ महिन्याचे वेतन अदा न केल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात कृषी आयुक्त, फलोत्पादन संचालक व जिल्हा कृषी अधिकारी, अहमदनगर यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी केल्या परंतु त्यांनी दखल न घेतल्याने मा. मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. सदर प्रकरणी त्यांनी तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस कॉ. बाळासाहेब सुरुडे यांनी दिला आहे.
यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कॉ. सुरुडे यांनी म्हटले कि, मा. उच्च न्यायालयाचे आदेशाने दोन्ही रोपवाटिकेत रोजंदारी कामगार हे कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवरही कामावर आहेत. सदर रोपवाटिकेत आजमितीस विविध कामे सुरु आहेत. काम करूनही ७ महिन्याचा पगार थकल्याने कामगारांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून त्यांना वेठबिगारीची वागणूक शासनाकडून देण्यात येत आहे. त्यात कोरोना साथीमुळे लॉकडाऊन असल्याने कामगारांना कुठल्याही प्रकारचे आर्थिक साधन नसल्याने जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करणेही दुरापास्त झाले आहे. यामुळे त्यांचे कुटुंबांचे पालन पोषण करणे अवघड झाले असून सदर प्रकरणी शासनाने तात्काळ लक्ष घालून कामगारांचे थकीत वेतन त्वरित अदा करावे अशी मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे कॉ. सुरुडे यांनी केली आहे.