साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 एप्रिल 2020
सोनई | दादा दरंदले | जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व मुळा ग्राहक भंडारच्या वतीने नेवासे तालुक्यातील एक लाख गरजू कुटुंबास सोमवार (ता.६) पासून जीवनावश्यक किराणा वस्तूचे वितरण करण्यात येणार आहे.अशी माहिती गडाख यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
जनता कर्फ्यूच्या बारा दिवसानंतर हातावर पोट असलेल्या कुटुंबाची चूल पेटणं अवघड होवून गेलं होतं.मजूर,हमाल,दुकानात काम करणा-या महिला व अनेक गोरगरिबांनी मंत्री गडाखांची भेट घेवून अडचणीची कैफियत मांडली. गडाखांनी अनेक गरीब वस्त्यांना भेट देवून स्थिती जाणून घेतल्यानंतर लगेचच शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व मुळा ग्राहक भंडारला मदत करण्याची संकल्पना मांडली.
शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ व मुळा बाजारच्या संचालकांनी खरी गरज लक्षात घेवून गरजू कुटुंबासाठी साखर,तांदूळ व तूरदाळ देण्याचा निर्णय घेतला. या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या एक लाख पिशव्या तयार करण्यात येवून सोमवार (ता.६) पासून वितरण सुरु होणार आहे. सात जिल्हा परिषद गटातील सर्व गावे व नेवासे शहरात हे वितरण होणार आहे.
व्यापा-यांचा विधायक सहभाग
सर्व किराणा साहित्य येवून पडल्यानंतर त्याच्या पॅकिंग चा प्रश्न झाला.सोनईतील व्यापारी असोसिएशन,जैन युवा मंच,माहेश्वरी युवा मंडळ,मुळा बाजार कर्मचारी व तरुण मंडळातील युवकांनी सर्व वस्तूचे पॅकिंग केले.
कोरोना व्हायरस वरील प्रतिबंधासाठी शासन स्तरावर मोठे काम सुरु आहे.पोलिस,आरोग्य विभाग दिवसरात्र झटत आहे. आपणही समाजाचं देणं आहोत हे सर्वांनी लक्षात घेवून गरजूंना मदत करणे गरजेचे आहे.पद, प्रसिध्दी,मीपणा व राजकीय जोडे बाजूला ठेवून हे काम करावे.
- शंकरराव गडाख, मृद व जलसंधारण मंत्री
-----------------------------
वाटप होणार: साखर-१०० टन
तांदूळ-१०० टन
तूरदाळ - ५० टन
कुटूंब संख्या: एक लाख
लाभकारक गावे:१२९
अंदाजे खर्च: एक कोटी पंचवीस लाख
वितरण करणार : पाचशे चाळीस व्यक्ती
पॅकिंग व्यवस्था: तीनशे वीस युवक व महिला