Shrirampur : आमदाराच्या ड्रायव्हर कडून आकारला दंड मास्क न लावता फिरत होता गाडीत


साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या ड्रायव्हरला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयाची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली.


       पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन संयुक्तपणे शहरांमध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत . दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मास्क न लावणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या गावकऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे . यासाठी नगरपालिकेने चार टीम तयार केल्या आहेत . सकाळच्या सत्रात सध्या हे काम सुरू असून दिवसभर हे काम करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.

         शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यअधिकारी प्रकाश जाधव, आरोग्य अधिकारी आरणे,पालिकेचे कर्मचारी व पोलिस अशा दोन्ही यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. राज्यांमध्ये सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरांमध्ये कुठेही पेशंट आढळणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये शितिलथा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची नाकेबंदी करावी. नवीन लोकांना शहरात येऊ देऊ नये. सबळ कारण असल्याशिवाय कोणालाही जाण्या-येण्याची परवानगी देऊ नये,  अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

           सध्या रमजान महिना सुरू असून वार्ड नंबर 2 मध्ये संध्याकाळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसून येतात. काल सायंकाळी पोलिसांनी वॉर्ड नंबर दोन, मिल्लत नगर या भागामध्ये गस्त घालून बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरात जाण्याचे आवाहन केले . मात्र पोलिस पुढे गेल्यानंतर मागे लोक बाहेर येतात. त्यासाठी शहर पोलिसांनी वार्ड नंबर दोनमध्ये चौका चौकांमध्ये पॉइंट तयार करून रमजान ईद होईपर्यंत तेथे लक्ष द्यावे तसेच लोकांनी बाहेर न येण्याची काळजी घ्यावी व आपले रक्षण आपणच करावे असे आवाहनही ज्येष्ठ लोकांनी केले आहे. शहर पोलीस रात्रंदिवस एक करून शहरांमध्ये गस्त घालत असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवीत आहेत. त्याबद्दल शहर पोलिसांच्या कामगिरीचे सुद्धा समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post