साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) राज्यात गरजू लाभार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत स्वस्त धान्याचे वाटप करणाऱ्या ५२ हजार ४३० स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाने तात्काळ विमा कवच देण्याची मागणी, श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरेचे उपसरपंच रवींद्र भालेराव यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळा यांच्याकडे केली आहे.
जिल्हा संघटनेने यासंदर्भात वेळोवेळी शासनाकडे मागणी केली असूनही या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भालेराव यांनी केला आहे.
या संदर्भात ते म्हणाले की, राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पोलिस विभाग, आरोग्य विभागासोबतच इतर कर्मचारी देखील ग्रामीण भागात सर्वेक्षण करून रुग्ण सेवा करीत आहेत. त्यांचे काम कौतूकास्पद आहे. त्यांना शासनाने ५० लाख रुपयांचे विमा कवच दिले आहे. तर दुसरीकडे या काळात कोणाही उपाशी राहू नये यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारामार्फत अन्नसुरक्षा, अंत्योदय योजनेसोबतच इतर लाभार्थ्यांना धान्य वाटपाच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील ५२ हजार ४३० दुकानदार दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत धान्य वितरीत करीत आहेत. शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातही धान्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे दुकानदारांचा चोविस तास लाभार्थ्यांशी संपर्क येत आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदाराच्या या कामाकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यातील सर्व दुकानदारांना तात्काळ विमा कवच द्यावे अशी मागणी शेवटी भालेराव यांनी केली आहे.
मागणीच्या अनुषंगाने स्वस्त धान्यदुकानदारांच्या कुटुंबियांचा विचार करता विमा कवच प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. नेमका किती रकमेचा हा विमा काढला जाऊ शकतो. याबाबत स्पष्टता नसली तरी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या व्हीसीमध्ये त्याबाबत सुतोवाच केले आहे.