साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. वसंत जमधडे यांच्या प्रकृतीस अगर धोका निर्माण झाल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागेल असा इशारा श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर, टिळकनगर येथील ग्रामस्थांसह येथील विविध संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
आज जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाबाबद विशेष दक्षता घेत ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वसंत जमधडे सह त्यांचे इतर सहकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अविरत सेवा दिली. मात्र काही दिवसांपूर्वी डॉ. जमधडे हे कोरोना पॉसिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना श्रीरामपूर येथेच क्वारंनटाइन करण्यात आले होते. परंतु काही राजकीय द्वेषातून तीन दिवसांपूर्वी त्यांना नगरला हलविले व सिव्हिल हॉस्पिटलला न ठेवता भिंगार जवळील मदरशांमध्ये नेऊन ठेवले. तेथे त्यांना साधी सतरंजी देऊन जमिनीवर झोपविले. अशा पद्धतीने वैद्यकीय सेवेतील अधीक्षक दर्जाच्या अधिकार्यास अमानुषपणे वागविणे हे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासनाच्या अशा व्यक्तीद्वैषी भूमिकेमुळे कोरोना विरुद्ध लढणार्या आरोग्य सेवकांच्या मनोधैर्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, तसेच त्याठिकाणी असंख्य रुग्णही आहे. व त्यात त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे. कुठल्या प्रकारची त्यांची आरोग्यासंदर्भात काळजी घेतली जात नाही. ज्या माणसाने स्वतःची पर्वा न करता तालुक्यातील प्रत्येकांची घरोघरी जाऊन कोरोना संदर्भात जनजागृती केली त्यास प्रशासन खूप वाईट वागणूक देत आहे. श्रीरामपूर येथील काही डॉक्टरांना क्वारंनटाइन असताना वेगळी वागणूक व डॉ. जमधडे यांना वेगळी वागणूक दिल्याने तालुक्यासह विशेष करून दत्तनगर, टिळकनगर परिसरातील ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. एकीकडे केंद्र सरकारने डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कठोर कायदा केला. तर दुसरीकडे काहींनी राजकीय आकसापोटी त्यांना नगर येथे क्वारंनटाइन करून राजकीय डाव साधला त्यांची प्रकृती ठणठणीत असताना त्यांच्यावर अन्याय का करण्यात आला ? त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला त्यांच्या प्रकृतीला काही धोका झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. तरी प्रशासनाने लवकरात लवकर डॉ. जमधडे यांना श्रीरामपूर येथे आणून क्वारंनटाइन करावे अशी मागणी सरपंच सुनील शिरसाठ, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर , माजी जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे, आर.पी. आयचे जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, खादी ग्रामउद्योगचे अध्यक्ष प्रेमचंद कुंकूलोळ, सामाजीक कार्यकर्ते अशोक लोंढे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, टिळकनगर कामगार पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे, मनसेचे सुरेश जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र गायकवाड, माजी सरपंच पी. एस. निकम, भारत त्रिभुवन, सुरेश शिवलकर, राजेंद्र गायकवाड, अजय शिंदे, रामदास रेने, सुनील संसारे, संजय जगताप, कैलास पगारे, प्रदीप गायकवाड, आनंद चावरे सह ग्रामस्थांनी केली आहे.