![]() |
प्रातिनिधिक छायाचित्र |
श्रीरामपूर (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे अन्न धान्य, दोन वेळ जेवणाचे प्रचंड प्रमाणात हाल सुरू आहेत. त्यातच ज्यांच्याकडे शिधा पत्रिका नाहीत, ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, ज्यांच्याकडे केशरी शिधा पत्रिका आहे मात्र कमकुवत परिस्थिती अशा नागरिकांची सध्या धान्य, किराणा मिळावा म्हणून वणवण सुरू आहे. अशाच नागरिकांची धान्य टंचाई, काही अडचण होऊ नये म्हणून तहसील कचेरी येथे २४ तास हेल्पलाईन नंबर बंद असल्याने गरिबांना वाली कोण ? नागरिकांची उपासमार झाल्यास जबाबदार कोण?? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते भैय्या भिसे यांनी विचारला आहे.
गरिबांना, गरजू कुटुंबांना धान्य मिळावे ते उपाशी राहू नये म्हणून लोकप्रतिनिधींनी वर्तमानपत्रात दिलेल्या बातमीनंतर अनेक गरीब व गरजूंनी बातमीत प्रसिद्ध केलेल्या तहसील कचेरी येथील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला मात्र हा नंबर बंद असल्याने अनेकांना पोटाची खळगी कशी भरावी ? हा यक्षप्रश्न पडला आहे.
![]() |
प्रातिनिधिक छायाचित्र |
गरिबांचे हाल बघून भिसे यांनी, याबाबत तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कोणती योजना आमच्याकडून अधिकृतपणे सुरू करण्यात आली नाही असे सांगितले. तसेच हा नंबर आपत्कालीन विभागाचा नंबर असल्याची स्पष्टोक्ती केली. अनेक दानशूर व्यक्तींकडून गरिबांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आता हा नंबर बंद असल्याने त्यातच अधिकाऱ्यांनी स्पष्ट मत मांडल्याने नेमके खरे काय समजावे ? कोणीही उपाशी राहू नये ही प्रामाणिक भावना की फक्त पेपरबाजीसाठी केलेला स्टंट ? तालुक्यातील गरिबांचा वाली कोण ? असा उद्विग्न सवाल भिसे यांनी विचारला आहे.