Shrirampur : केशरी कार्डधारकांनाही अंत्योदय व बीपीएलच्या दरातच धान्य मिळावे ; भीमराज बागुल

साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ प्रती व्यक्तीमागे देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना ८ रुपये प्रती किलो गहू आणि १२ रुपये प्रती किलो तांदूळ अशा दरात धान्य मिळणार आहे ; मात्र केशरी कार्डधारकांनाही अंत्योदय व बीपीएल कार्डच्या दरातच धान्य मिळावे. ही सारीच कुटुंबे कष्टकरी आहेत. आता तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतमजूर, कष्टकरी यांची रोजगार नसल्याने उपासमार आणि आर्थिक कोंडी होत आहे. तसेच  ज्या लोकांकडे शिधापत्रिका उपलब्ध नाही, अशा लोकांच्या आधार कार्डवर राशन देण्यात यावे आणि ज्या लोकांकडे राशन कार्ड व आधार कार्ड सुद्धा नाही अशा लोकांची यादी करण्यात यावी व त्या लोकांना प्राधान्यक्रमाने राशन वितरित करावे, अशी मागणी आर.पी. आयचे  जिल्हाप्रमुख भीमराज बागुल यांनी केली आहे. 


           तसेच जिल्ह्यासह श्रीरामपूर तालुक्यातील सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना सरसकट तीन महिन्यांचे धान्य द्यावे. नागरिकांजवळ केशरी रेशन कार्ड असूनही अनेक कुटुंबांना धान्य मिळत नाही. काही ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धतीत एकच रेशन कार्ड असल्याकारणाने उत्पन्न वाढलेले दिसत आहे, तर  काही नागरिकांच्या रेशन कार्डवर उत्पन्न वाढ दाखवली गेली आहे. बेभरवशाच्या नेटवर्कमुळे काहीजणांना बारा अंकी बारकोड नंबर मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केशरी रेशनकार्ड धारक रास्त दरातील धान्य मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यात रोजंदारी, मोलमजुरी करणारा आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. काही रेशनकार्ड धारकांनी स्वतःचे उत्पन्नाबाबतचे हमीपत्र तहसीलदार आणि पुरवठा कार्यालयात सादर करूनही त्यावर कोणतीच अंमलबजावणी झालेली नाही. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बिकट अवस्थेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने घोषित केलेले धान्य पुढील तीन महिने सरसकट सर्व केशरी शिधापत्रिका धारकांना मिळावे अशी मागणीही, बागुल यांनी केली आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post