Shrirampur : सामाजिक भान राखत खोरेंनी गरजूंना दिले किराणा किट ; आदिकांनीही लावला हातभार ; फोटो जाहिरात टाळत गरजूंचे नाव गुप्त ठेवत जपली संस्कृती

साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्र.१६ मध्ये महिनाभरापासून गरीब व गरजूंना किराणा, धान्य किटचे वाटप करत आधार देण्याचा प्रयत्न नगराध्यक्षा अनुराधा आदिक, जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या सहकार्याने मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे व सहकारी करत आहेत.


        कोरोना कोव्हिड-१९ चा संसर्ग वाढू नये म्हणून देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून गरिबांसाठी दोन वेळा जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्यासाठी पहिल्या दिवसापासून मोरया फाउंडेशन प्रयत्नात आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे प्रभागातील अशा गरीब व गरजू कुटुंबांची माहिती संकलित करून त्यांना मदतीचा हात देत मोरया फाउंडेशनतर्फे किराणा किटचे वाटप केले गेले. हे किट देताना गरजूंचे नाव गुप्त ठेवत किट देताना फोटो न काढता सामाजिक जाणिवेची जबाबदारी मोरया फाउंडेशनच्या सदस्यांनी पार पाडली.

           नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी २०० किलो गहू, २०० किलो तांदूळ, १०० किलो डाळ तर नगरसेविका स्नेहल केतन खोरे यांनी ३५० किलो गहू, ३५० किलो तांदूळ, १७५ किलो डाळ स्वखर्चाने उपलब्ध करून दिली. या व्यतिरिक्त काही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणाऱ्या काही कुटुंबांना खोरे यांनी तेल, साखर, चहा पावडर, सोयाबीन वडी, तूरडाळ, तांदूळ, गहूचे वेगळे किट देत संकटसमयी नागरिकांसाठी यथाशक्ती उभे राहण्याची प्रयत्न केला.

         या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहेत परंतु त्यांना दुकानदार धान्य देत नाही अशा नागरिकांच्या समस्या सोडवत त्यांना रेशन दुकानदारांकडून धान्य उपलब्ध करून देण्यासाठी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी समयसुचकता दाखवत प्रयत्न केले. त्यामुळे अनेक कुटुंबांना रेशन दुकानदारांकडून धान्य मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post