Shrirampur : कोणीही उपाशी राहणार नाही असे म्हणणारा ढोंगी फक्त बातम्या देण्यात पटाईत ; भाजपाची टीका, ५० लाखांचा आपत्कालीन आमदार निधी का खर्च करत नाही..??



साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत नजरचुकीने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या बढाया उघड्या पडत असल्याने खोट्या फुशारक्या मारून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आल्याची खरमरीत टीका श्रीरामपूर भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस अक्षय वर्पे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


         २०१४ च्या विधानसभेपासून गायब असलेला धूमकेतू २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार संघात दिसला. नजरचुकीने विजयी झालेल्या महाशयाने मतदारसंघात विकास कामे तर दूरच पण कोणाचीही मौत, दहावा, तेरावा, लग्न, साखरपुडा, वास्तुशांती, वाढदिवसाच्या कार्यक्रमालाही उपस्थिती लावली नाही. नागरिकांचेच काय तर कार्यकर्त्यांच्याही सुखादुःखात न येणाऱ्या महाशयाला त्यांच्यासाठी मते मागणारे कार्यकर्तेच वैतागले असून कवडीचे काम आणि दवंडी गावभर असा केविलवाणा प्रयत्न हे महाशय ज्यांना स्वतःच्या गावात कोणी ओळखत नाही अशांचे नाव पुढे करून करत आहे.

       मुळात अर्थसंकल्पात एखाद्या मतदारसंघासाठी निधीची तरतूद केली म्हणजे निधी मिळाला असा अर्थ होत नाही यातच निधी आणण्याची टिमकी मिरवणाऱ्या लोकप्रतिनिधीची अक्कलहुशारी उघडी पडते. मती गुंग झालेल्या स्वार्थी पुढाऱ्यांसारखे भाजपचे कार्यकर्ते प्रसिद्धीसाठी हापापलेले नसतात. ज्याने लोकवर्गणीचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केला त्याची लोकांच्या पैशावर फुशारक्या मारायची सवय जनतेने ओळखली आहे. ज्यांच्या चुकीमुळे हे महाशय पदावर बसले त्यांना व या नाकर्त्या लोकप्रतिनिधीला जनता माफ करणार नाही.  

             शहरात फक्त एकाच भागात गोरगरीब राहतात का ? त्याही भागात किती गरिबांना यांनी लोकवर्गणीचे सामान दिले ? हे तपासायला हवे. ९ लाखांचे डेटॉल कुठे वाटले ? आपत्कालीन ५० लाखांचा आमदार निधी का खर्च करत नाही ?अतिविद्वानाचा कोणता अभ्यास त्यावर सुरू आहे..? काही पुढाऱ्यांच्या चुकीमुळे, जिरवाजिरवीमुळे या संधीसाधूला संधी मिळाल्याने जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. कोणीही उपाशी राहणार नाही असे म्हणणारा ढोंगी फक्त बातम्या देण्यात पटाईत असून बगलबच्चे पुढे करून भाजपवर आरोप करणाऱ्या महाभागाने आवरते घेतले नाही तर भूतकाळातील त्याचे असंख्य किस्से जगजाहीर करावे लागतील असा इशारा,  भाजपचे पदाधिकारी नेते गणेश राठी, तालुकाध्यक्ष सुनील वाणी, माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, अ. स. सा. का. संचालक बबन मुठे, संघटन सरचिटणीस सतीश सौदागर बेलापूर शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, रामभाऊ तरस, सुनील दिवटे, गणेश अभंग युवा मोर्चा चे अक्षय वर्पे, विशाल यादव, विशाल अंभोरे ,अक्षय नागरे , रवी पंडित ,निलेश जगताप, अमोल अंबिलवादे यांनी दिला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post