साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोना मुळे सध्या सर्वत्र लॉक डाऊन चालू आहे . शाळांना सुट्टी आहेत . माणसं घरात बसून आहेत . मुलांना गृहपाठ देण्यासाठी येथील परमवीर शहीद अब्दुल हमीद नगरपालिका डिजिटल शाळा क्रमांक पाचचे शिक्षक गेली तीन वर्ष मोबाईलवर एसएमएस द्वारे गृहपाठ देत आहेत. शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री. ज्ञानेश्वर पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक श्री. सलीमखान पठाण यांनी सर्व शिक्षकांना पालकांशी संपर्क ठेवण्याचे आवाहन केले .
घरी मुले करीत असलेला गृहपाठ व्हाट्सअप वर मागवून मुलांना मार्गदर्शन करावे अशा सूचना त्यांनी सर्व वर्गशिक्षकांना दिल्या. त्यानुसार इयत्ता चौथीतील एका मुलीने कोरोना व्हायरस या विषयावर लिहिलेला निबंध वर्ग शिक्षिकेच्या मोबाईल वर पाठवला . चांगला निबंध म्हणून तो शाळेच्या ग्रुप वर पाठवण्यात आला . उत्सुकतेपोटी त्या निबंधाचे वाचन करताना मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांचे असं लक्षात आलं कि, मुलीने उर्दूमध्ये लिहिलंय, "कोरोना व्हायरस की वजेसे सबको बहुत तकलीफ हो रही है. कामधंदे बंद हो चुके है.हम सब लोग घर मे बैठे है. खाने का सामान लाने के लिए पैसे नही है.कोई भी सहेली कोरोना व्हायरस की वजेसे महल्ले मे नही आ रही है. या निबंधातील "खाने का सामान लाने के लिए पैसे नही है" हे वाक्य त्यांच्या हृदयाला भिडले. त्यांनी वर्गशिक्षिका निलोफर शेख यांना फोन करून सदर मुलीच्या पालकांशी संपर्क करून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यास सांगितले. वर्ग शिक्षिकेने पालकांशी संपर्क साधला. त्या मुलीच्या आईने सांगितले की माझे पती दररोज गाडी वर भांडी विकायला जातात. परंतु आठ दिवसापासून हा धंदा बंद आहे आणि खरोखर घरामध्ये सामान आणायला पैसे नाहीत. आम्ही मध्यमवर्गीय लोक कोणाला काही मागू शकत नाही. त्यामुळे सध्या उपासमार सुरू आहे.वर्ग शिक्षिकेने त्या पालकाची ही करून कहाणी मुख्याध्यापकांना सांगितली.त्यांनी आपल्या एका किराणा दुकानदार मित्राशी संपर्क करून आवश्यक साहित्याची मदत या पालकाला केली तसेच सर्व वर्ग शिक्षकांना सूचना देऊन आपापल्या वर्गातील मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचे तसेच सर्व शिक्षकांच्या वतीने अशा गरजू लोकांना मदत करण्याचे आवाहन केले . त्याला प्रतिसाद देत वर्ग शिक्षकांनी सुद्धा आपापल्या पालकांशी संपर्क केला सर्व शिक्षकांनी वर्गणी करून अशा सर्व पालकांना मदत केली .शाळेतील शिक्षिका मिनाज शेख यांनी वैयक्तिक रित्याही आपल्या पालकांना मोठी मदत केली. कोरोना संकटामुळे गेले पंधरा दिवस सर्व व्यवहार ठप्प असल्याने जनतेचे खूपच हाल सुरू आहेत .घरापुढे टू व्हीलर उभी दिसत असली तरी घरामध्ये खायला काही नाही अशी परिस्थिती आहे . समाजातील अशा घटकांना सुद्धा इतर लोकांनी मदत करण्याचे आवाहन प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे व मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांनी केले आहे .
समाजात जे खरोखरच गरीब आहेत त्यांना समाजातील व्यक्ती, संस्था यांच्या रूपाने मदत मिळत आहे. परंतु खऱ्या अर्थाने जे लोक रोज दोन तीनशे रुपये कमावून हातावर आपल्या कुटुंबाचे पोट भरतात अशा मध्यमवर्गीय लोकांचे सध्या खूप हाल सुरू आहेत . अशा लोकांना सुद्धा मदत करण्याची गरज आहे .
--- सलीमखान पठाण, मुख्याध्यापक न. पा. शाळा क्रमांक 5 ,श्रीरामपूर