साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 एप्रिल 2020
टिळकनगर | वार्ताहर | श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथील प्रगतशील शेतकरी पत्रकार लालमोहमद जहागीरदार या खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी प्रकरण मार्गी लावण्याबाबद अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ शाखेतील अव्वल कारकून सुनील फाफाळे यांना 50 हजार लाच प्रकरणी प्रशासनाने निलंबित केल्याने संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
शासनाने खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीची जमिनी परत देण्याची प्रक्रिया सुरू केल्याप्रमाणे जहागीरदार यांनी श्रीरामपूर प्रांताधिकारी यांच्याकडे तालुक्यातील वडदगाव येथील सव्हे नंबर 35 व 36 मधील 10 एकर 7 गुंठेचा जमिन मागणी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार प्रांताधिकारी श्रीरामपूर यांनी प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरी साठी पाठविला. तब्बल चार ते पाच महिन्याचा दीर्घ कालावधी होऊनही प्रकरण मंजूर होत नसल्याने 3 मार्च ते 9 मार्च दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळ शाखेतील अव्वल कारकून सुनील फाफाळे यांच्याकडे प्रकरणाची विचारणा केली असता प्रकरण झुलावत ठेऊन प्रकरण मंजुरीसाठी 50 हजार दिल्याशिवाय प्रकरण मंजूर करून मिळणार नाही असे ठासून सांगितले होते.
दरम्यानच्या, काळात जहागीरदार यांनी सदर प्रकरणाची तक्रार अहमदनगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पोलीस अधीक्षक यांनी घटनेची खातरजमा करीत 9 मार्च 2020 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा रचून सुनील फाफाळे यांना ताब्यात घेऊन अटक करून अहमदनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने फाफाळेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वरील प्रकरणी सर्व अहवाल प्राप्त करून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी फाफाळे यांच्या अटकेस 48 तासापेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यांना म. ना. से. शिस्त व अपील 1979 नियम 4(2) अन्यये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून जिल्हाधिकारी यांनी लोकसेवक सुनील फाफाळे यांना अटकेच्या दिनांकापासून म्हणजेच 9 मार्च 2020 पासून पूर्वलक्षी प्रभावाने शासन सेवेतून निलंबित केले आहे.
तसेच निलंबनाच्या कालावधीत लोकसेवक फाफाळे यांनी खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा करू नये तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्यानुषंगाने त्यांचे विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले आहे.