साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 एप्रिल 2020
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविलेल्या 73 स्त्राव चाचणी नमुन्याचे अहवाल आज ( दि. 4) प्राप्त झाले असून त्यात 3 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यात नगर शहरातील 2 जण तर राहाता तालुक्यातील लोणी येथील एकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता 20 झाली आहे. त्यातील 2 बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाधित आढळलेल्या व्यक्तीमध्ये नगर शहरातील एक व्यक्ती 76 वर्षीय तर दुसरी व्यक्ती 35 वर्षीय आहे लोणी येथील व्यक्ती 46 वर्षीय आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने यांना लागण झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.
सुरुवातीला आज ( दि. 4) सायंकाळी 73 पैकी 35 स्त्राव चाचणी अहवाल पुणे येथून प्राप्त झाले. त्यात, केवळ एक व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी पुन्हा उर्वरित ३८ स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यात आणखी 2 बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, आज (दि.4) दुसरा बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने वैद्यकीय उपचारानंतर घरी सोडले. दुसऱ्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले. आरोग्य यंत्रणेच्या तपासणी नंतर त्याला घरी सोडण्यात आले. यावेळी बूथ हॉस्पिटलचा डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉय यांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. आणखी 14 दिवस त्याला देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.
आरोग्य यंत्रणेच्या सकारात्मक प्रयत्नामुळे आणि योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला. इतर रुग्णावर आपण चांगले उपचार करीत आहोत, त्यामुळे तेही निश्चितपणे बरे होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केला. त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि वॉर्डबॉय यांचे श्री. द्विवेदी यांनी कौतुक करत आभार मानले.