Nevasa : मंत्री शंकरराव गडाखांची मोटारसायकल स्वारी थेट संकटग्रस्तांच्या दारी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 एप्रिल 2020
नेवासा|दादा दरंदले |ना पोलीसांचा फौजफाटा.... ना त्यांचा बंदोबस्त.....ना विविध खात्याचे अधिकारी..... ना हातात डायरी घेतलेली .... स्वीय सहाय्यक सोबत , या एकटेपणात नामदार गडाख पोहचले थेट अडचणीतील जनतेच्या  भेटीला आणि सोडवली जनतेची समस्या. मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांनी सोनई ता नेवासा येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला भेट दिली. पण तेथे मोटारसायकलवरुन जात. तेथे कोरोना व्हायरसची माहिती देत घ्यावयाची प्रतिबंधात्मक  काळजी  लोकांच्या अडचणी चर्चेत सोशल डिस्डंट ठेवून समजावून घेतल्या.

        संकटावर आपण सर्व मात करु  मी आपल्या सर्वांसोबत आहे असा आश्वासक धीर दिला .या साधेपणाचे ग्रामस्थांनी ,नागरिकांनी कौतुक केले आहे. सोनई येथील संतोष क्षीरसागर यांच्या मोटारसायकलवर बसून जलसंधारण मंत्री गडाख यांनी खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला भेट देवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  विविध कुटुंबांची अडचण जाणून घेतली. नामदेव सावंत,मोहन शेगर,साहेबराव शिंदे,भागाबाई सावंत,रुपाबाई शिंदे यांनी बंदमुळे उपासमार सुरु असल्याचे सांगितले. त्यावर मंत्री गडाख यांनी तातडीने भोजनाची व्यवस्था होईल असे सांगितले.त्या प्रमाणे व्यवस्थाही करण्यात आली. मंत्री म्हटलं की नेहमी मागे पुढे पोलीस वाहनांची गर्दी, सायरनचा भला मोठा आवाज, संबंधित खात्याचे अधिकाऱ्य़ांची रेलचेल आणि अर्थातच वजनदार कार्यकर्त्यांचा लवाजमा ठरलेला असतो. मात्र या सर्वांना फाटा देत  मंत्री गडाखांनी अतिशय साध्या पध्दतीने वस्तीतील गोरगरिबांच्या दारात जावून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मागील आठवड्यात गडाखांनी स्वत:चा बंदोबस्त नाकारुन हा बंदोबस्त कोरोना प्रतिबंधासाठी वापरावा असा अगळा निर्णय घेतला होता. ग्रामस्थ नामदेव सावंत म्हणाले, गडाख साहेबांनी भेट दिल्याने मोठा धीर आला. त्यांना आमच्या रेशनकार्ड, रस्ता, पाण्याची समस्या सांगितली आहे. त्यांनी हे प्रश्न लवकर मार्गी लागतील असे सांगितले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post