Shrirampur : उक्कलगावात लम्हाणबाबा शिवारात बिबटयाचा तळ कायम ; कोरोनाची भितीमुळे वनाधिकारी घटनास्थळी येईनात

साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 एप्रिल 2020
श्रीरामपूर : तालुक्यातील उक्कलगाव शिवारातील लम्हाणबाबा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बिबटयाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून लम्हाणबाबा परिसरातील रहिवाशी दिगंबर मोरे यांना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लगतच्या मकाच्या शेतातून बिबट्याची डरकाळी ऐकू आली होती.  त्यांनी डरकाळीच्या दिशेने बघीतले असता बिबटया असल्याची खात्री झाली. दरम्यान, हाच प्रकार दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सायंकाळीही झाल्याने त्यांनी इतर शेतकर्‍यांना त्यांची कल्पना दिली. त्यांनी तातडीने वनविभागाचे कोपरगाव वनक्षेत्रपाल संतोष जाधव यांना संपर्क केला असता कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे आम्ही घटनास्थळी येऊ शकत नाही. तुम्हीच तुमच्या स्वतःची काळजी घ्या, सायंकाळी साडेपाच नंतर घराबाहेर पडू नका, असा सल्ला देत त्यांनी कोणतीही कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली. 
(प्रातिनिधिक छायाचित्र )

           वन अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक रहिवासी व शेतकरी भीतीच्या सावटाखाली असतानाच काल सायंकाळी पुन्हा लम्हाणबाबा शिवारात त्याच मकाच्या शेतातून डरकाळी फोडत बिबटया बाहेर पडल्याचे उत्तम थोरात, विकास थोरात, शुभम थोरात, गणेश मोरे, प्रकाश थोरात, हर्षद वाबळे यांनी बघितल्याने त्यांनी मोरे यांच्या घराकडे धूम ठोकत वरिष्ठ  वनरक्षक  रमेश देवखिळे यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. लम्हाणबाबा परिसरात तातडीने पिंजरा बसविण्यात यावा, अशी  मागणी केली असता  त्यांनीही कोरोनाची भीती  दाखवत हात झटकल्याने शेतकरी दहशतीखाली आहेत. सदर बिबट्याने काल याच परिसरातील  रोकडे यांच्या पाळीव कुत्र्यावर ताव मारला असून तो मानवी वस्तीत घुसल्यास मोठा अनर्थ घडू शकतो अशी  भीती व्यक्त केली जात आहे. 


   सदर बिबटया हा मादी बिबट्या असून त्यांच्या मागे दोन बछडे असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पाहिले आहे त्यामुळे हा प्रकार गांभिर्याने घेण्याची गरज आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post