Shrirampur | सार्वजनिक मंडळांनी शिल्लक निधी गरजूंना द्यावा ; नागरिकांची मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 एप्रिल 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी ) देशासह राज्यात लॉक डाऊन घोषित होऊन आता 18 दिवस झाले आहेत . आता हा लॉक डाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे . या पार्श्वभूमीवर गेले वीस दिवस ज्यांचे व्यापार, धंदे, व्यवहार ठप्प झाले आहेत. गोरगरिबांना जगणे अवघड झाले आहे. लोकडाऊनमुळे बाहेर जाणे बंद. काम नाही, रोजगार नाही, समाजाची अन्नान्न दशा होत आहे. लोक आता आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत आहेत. साचलेला व जमा असलेला पैसा संपल्यामुळे असे लोक सध्या हवालदिल झाले आहेत . अशा लोकांना सुद्धा आता मदतीची गरज आहे . यासाठी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळे व नवरात्र उत्सव मंडळे यांनी गेल्या वर्षीचा जो शिल्लक निधी आहे तो  या जनतेच्या मदतीसाठी वापरावा,  अशी मागणी गरजू लोकांमधून करण्यात येत आहे .


          लॉक डाऊन मुळे गेले तीन आठवडे सर्व व्यवहार बंद आहेत . जे लोक दररोज आपली रोजीरोटी कमावतात अशा लोकांकडे संचित रक्कम आता समाप्त होत आहे . काहींची झाली आहे . त्यामुळे आपल्या कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे . मध्यमवर्गी लोकांचे खूपच हाल सुरू झाले आहेत . अशा लोकांना सुद्धा मदतीची गरज आहे. शहरातील अनेक गणेश मंडळे व नवरात्रोत्सव मंडळे यांच्याकडे बराच मोठा निधी जमा असल्याची शहरात चर्चा असून या निधीचा सदुपयोग गरजू लोकांच्या मदतीसाठी व्हावा व त्यातून अशा गरजू लोकांना मदत मिळावी अशी मागणी समाजातील या घटकांकडून करण्यात येत आहे . याबाबत तालुक्याचे लोकप्रतिनिधी, शहराच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, प्रांताधिकारी, तहसीलदार ,प्रशासकीय यंत्रणा आदींनी विचार विनिमय करून शहरांमध्ये असणाऱ्या या गरजू मध्यमवर्गीय लोकांसाठी निधी उभारून त्यांच्या कुटुंबांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होईल अशा पद्धतीने नियोजन करावे अशीही मागणी या गरजू घटकांनी केली आहे . त्याचप्रमाणे शहराच्या विविध भागातील गणेश मंडळे व तरुण मंडळे ,नवरात्रौत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन आपापल्या परिसरातील असे जे गरजू लोक हलाखीच्या परिस्थितीमुळे अडचणीत आले आहेत, परंतु कोणाकडे भीकही मागू शकत नाही, अशा लोकांना शोधून त्यांना मदत करावी आणि आलेल्या संकटातून सावरण्यासाठी एकमेकांना आधार द्यावा अशी मागणी देखील या मध्यमवर्गीय घटकातून केली जात आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post