साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 एप्रिल 2020
टिळकनगर | वार्ताहर | कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तसेच लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामीण भागातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर, विद्यार्थी उपाशी राहू नये तसेच गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेता राज्य सरकारने तात्काळ शिवभोजन थाळी चालू करण्याची मागणी आर.पी.आय.चे जिल्हा प्रमुख भीमराज बागुल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात महाविकास आघाडीने शहराच्या ठिकाणी शिवभोजन थाळी देण्याचा उपक्रम चालू केला असला तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही योजना आली नसल्याने शहरातील लोक तुपाशी आणि ग्रामीण भागातील लोक उपाशी अशी अवस्था निर्माण झाली आहे.शिवभोजन थाळीच्या प्रतिक्षेत ग्रामीण भागातील लोक असून तात्काळ शिवभोजन केंद्र सुरु करावे कारण ग्रामीण भागात शिवभोजन थाळीची अत्यंत गरज आहे. ही योजना शहरीभागा प्रमाणे ग्रामीण भागातही तेवढीच महत्वाची आहे. सरकारने शहरी आणि ग्रामीण असा भेदभाव करू नये. शिवभोजन थाळीचे केंद्र जिल्हा, तालूका स्तरावरून आता गावस्तरावर देखील सुरु करण्याची गरज आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब लोक केवळ दोन वेळेची पोटाची खडगी भरण्यासाठी मजूरीला जातात. मात्र कोरोनामुळे संपूर्ण लॉकडाउन असल्याने सर्वसामान्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने उपाशीपोटी दिवसभर राहत आहे. तेव्हा ग्रामीण भागात शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्याची गरज वाटते. सद्या शहरी भागात असलेली ही योजना ग्रामीण भागातही सुरु करावी अशी सामान्य व कष्टकरी मजुरातून मागणी केली जात आहे. राज्यसरकारने शिवभोजन योजनेचा विस्तार करून पुढील तीन महिने तरी ग्रामीण भागात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय तात्काळ द्यावा ; जेणेकरून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर नागरिकांचे जेवणाअभावी हाल होणार नाही असे बागुल यांनी म्हंटले आहे.
It's very needfull
ReplyDelete