साईकिरण टाइम्स ब्युरो, 7 एप्रिल 2020
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील 28 वर्षीय युवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुणे येथेल बी.जे.मेडिकल कॉलेज मार्फत कळविले आहे. सदर व्यक्ती जन्मतःच मतिमंद असून आजारपनासाठी खाजगी रुग्णालयात उपचार घेत होती. सदर व्यक्तीस कोरोना विषाणूचा संसर्ग कशामुळे झाला याचा शोध आरोग्य यंत्रणेमार्फत घेण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीच्या घरातील व ज्या डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले, तसेच ज्या व्यक्ती संपर्कात आल्या त्या 21 जणांना तात्काळ जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे पुढील तापासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, सदरचा परिसर कोरोना संसर्गबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या गावची लोकसंख्या 750 व कुटंबाची संख्या 140 असून 4 आरोग्य पथकामार्फत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजगुरू व त्यांचे पथक शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करत आहेत.
या पार्श्वभूमीवर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेऊ नये. सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये. विनाकारण रस्त्यावर येऊ नये. आपल्या परिसरात बाहेरच्या राज्यातून, जिल्ह्यातून, तालुक्यातुन कोणीही व्यक्ती येऊन वास्तव्य करीत असल्यास प्रशासनास तात्काळ कळवावे. व संचारबंदीच्या कालावधीतील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी केले आहे. या सर्व परिस्थितीवर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वसंत जमधडे नियंत्रण ठेऊन आहे सामान्य नागरिकांनी घाबरू नये व शासकीय यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.