साईकिरण टाइम्स ब्युरो, 31मार्च 2020
श्रीरामपूर : सध्या सर्व जगभरत कोविड-१९ ( कोरोना व्हायरस ) ने धुडगुस घातला असून सर्व जगभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रत्येक देशांचे सरकारे हवालदिल झाले आहेत. प्रशासन सर्व पातळीवर कोरोनाचा नायनाट करण्याचा प्रयत्न असून जनता हवी तितकी प्रशासनास सहकार्य करत नाही.
त्याच पार्श्वभूमिवर एक एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभर " एप्रिल फुल " म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या जवळच्या लोकांना फुल ( मुर्ख ) बनविण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवत असतात. त्यामुळे तात्पुरती करमणुक होती खरी परंतु त्याचा दुरगामी त्रासही होऊ शकतो. त्यातच सध्या कोविड-१९ च्या प्रादुर्भावाने समाजात भितीचे वातावरण आहे. त्यामुळे कोविड-१९ चा एप्रिल फुल बनविण्यात कोणीही वापर करू नये. अथवा समाजात गैरसमज तयार होईल अश्या अफवा पसरवू नये, असे आवाहन वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघाचे श्रीरामपूर ( महाराष्ट्र ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
एप्रिल फुल हा करमणुकीचा खेळ खेळताना समोरच्याला गुगली टाकण्याच्या नादात तुम्हीच बोल्ड व्हाल असा इशाराही विघावे यांनी दिला असून सरकार व प्रशासन जे आदेश देतील त्याचे निमूट पालन करून प्रत्येकाने घरातच थांबावे व प्रलंयकारी कोविड-१९ लाच एप्रिल फुल करावे. असेही दत्ता विघावे यांनी पत्रकात नमूद केले आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षी आपल्या निकटवर्तीयांना नाही तर कोरोना व्हायरसला एप्रिल फुल करू या अशी भावनीक सादही दत्ता विघावे यांनी सर्व जनतेला घातली आहे