साईकिरण टाइम्स ब्युरो | 11 मार्च 2020
मुंबई | राज्यामध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सामुहीक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे. शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात घेतानाच खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबवायची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी. जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. पुणे येथील नायडू रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा असून गरज पडल्यास पिंपरी चिंचवड येथील नवीन रुग्णालयात देखील विलगीकरणाची सुविधा करावी. व्हेंटिलेटर्सची उपलब्धता ठेवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.उपचारासाठी आवश्यक असणारी कुठलीही बाब, उपकरणाची आवश्यकता भासल्यास त्याची खरेदी जिल्हा नियोजन खर्चातून खरेदी करावी, माध्यमांना दररोज माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले.