श्रीरामपूर टाइम्स ब्युरो | दि. 6 मार्च 2020
श्रीरामपूर | नियोजित जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या व स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या श्रीरामपूर शहरात वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वछतागृहे ( मुताऱ्या ) व सार्वजनिक शौचालयांची संख्या अतिशय कमी असून, शहराच्या या मूलभूत प्रश्नाकडे श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
शहरात पालिकेच्या रेकॉर्ड प्रमाणे वॉर्ड नं. 1 ते 7 मध्ये केवळ 27 स्वछतागृहे (मुताऱ्या ) असून त्यांची अवस्थाही अतिशय दयनीय झाली आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी 41 शौचालये असून त्यांचीही दुरवस्था झाली आहेत. विशेष म्हणजे पुरुषांप्रमाणे महिलांचीही लोकसंख्या जास्त असताना महिलांसाठी केवळ गांधी चौकात एकच स्वछतागृह आहे. शहरात कामानिमित्त अनेक महिला, तरुणी येत असतात. पुरुषांच्या बरोबरीने महिलांची संख्या जास्त असताना महिलांसाठी शहरात मुख्य रस्त्यावर गांधी चौकात केवळ एकच स्वछतागृह आहे. महिलांसाठी शहरात योग्य ठिकाणी स्वछतागृहांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यातून सिद्ध होत आहे. शहरच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहरात योग्य ठिकाणी स्वछतागृहे व शौचालयांची संख्या वाढवून त्यांची चांगली स्वछता राखणे आवश्यक आहे.
श्रीरामपूर शहराची लोकसंख्या दिवसागणिक वाढत असून श्रीरामपूर हे नियोजित जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात आहे. श्रीरामपूरसारख्या स्मार्ट शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृहांची संख्या ही अतिशय कमी असून आहे. त्यामुळे मुताऱ्यांबाहेर नागरिकांना वेट करावा लागत आहे. शहरातील अतिशय महत्वाचा व गजबलेल्या मुख्य रस्त्यालगत गांधी चौक परिसरात पुरुषांसाठी केवळ 1 स्वच्छतागृह असून त्यात इतर स्वछतागृहांच्या तुलनेत सर्वाधिक 8 सीट्स असतानाही या ठिकणी नेहमी गर्दी होत असते व या मुतारीचा दुर्गंध मुख्य रस्त्यावरील येजा करणाऱ्या लोकांना येत असतो. त्यामुळे शहरात योग्य ठिकाणी मुताऱ्यांची संख्या वाढवून त्यांची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. पालिकेच्या रेकॉर्ड नुसार वॉर्ड नंबर 1 मध्ये दशमेशनगर, आंबेडकर कॉलनी, गोंधवनी गाव, महानुभाव आश्रम, महादेवनगर, आंबेकर समाज मंदिराजवळ याठिकाणी केवळ सहा मुताऱ्या असून त्यात 14 सीट्स आहेत. वॉर्ड नंबर 2 मध्ये सिंधी मंदिराजवळ 1 मुतारी असून त्यात केवळ 2 सीट्स आहेत. वॉर्ड नंबर 3 व 4 मध्ये जिजामाता चौक, नगरपालीका कार्यलय, सेंट्रल बँक , शिवाजी रोडवरील महाराष्ट्र बँक, पूनम हॉटेल, पालिका उद्यान या ठिकाणी 7 मुताऱ्या असून त्यात 16सीट्स आहेत. वॉर्ड नंबर 5 व 6 मध्ये केव्ही रोड, गांधी चौक, रेल्वे स्टेशन, ढोले मटणखानाजवळ, साई मंदिर परिसर आदी ठिकाणी 7 मुताऱ्या असून त्यात 27 सीट्स आहेत. वॉर्ड नंबर 7 मध्ये झंवर मळा, जनता हायस्कुल जवळ, बाबा वॉच जवळ बेलापूर रोड याठिकाणी 6 मुताऱ्या असून त्यात 12 सीट्स आहेत. तर शहरात विविध ठिकणी 41 पब्लिक टॉयलेट आहे. शहराच्या लोकसंख्येचा विचार करता 27 स्वछतागृहे व 41 शौचालये ही संख्या अतिशय कमी असून शहरात योग्य ठिकाणी मुताऱ्या व स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. मुताऱ्यांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून लोकांना नाक दाबून विधी उरकताना जीव गुदमरून जात आहे अशी दयनीय अवस्था मुताऱ्यांची झाली आहे. प्रसाधनगृहांची संख्या कमी असल्यामुळे मुतार्यांबाहेर नागरिक अनेकवेळा थांबलेले दिसतात. नागरिकांचा मूलभूत प्रश्नाकडे पालिकेने लक्ष घालून शहरात योग्य ठिकाणी प्रसाधनगृहे व स्वच्छतागृहांची संख्या वाढवून त्यांची चांगली स्वछता राखणे गरजेचे आहे.