रेशन दुकानांमधून सरसकट धान्य पुरवठा करावा ; केतन खोरे
साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 मार्च 2020
श्रीरामपूर | कोरोना व्हायरसमुळे जगभराची झोप उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय बंद राहणार आहे. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांचे विशेषतः गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. महाराष्ट्र शासनाने श्रीरामपूर शहरातील सर्व नागरिकांना सरसकट धान्य पुरवठा करत दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडे मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका स्नेहल खोरे यांनी केली आहे. याबाबत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही लक्ष घालावे अशी विनंती केतन खोरे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केतन खोरे यांनी म्हटले आहे की, रेशन धान्य दुकानदारांमार्फत गहू, तांदूळ, हरबरा डाळ अत्यंत गरीब कुटुंबांना कमी दरात देण्याचे नियोजन अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे केले जाते. कोरोना व्हायरस वाढू नये म्हणून नागरिकांना महिनाभर घरातच राहावे लागणार आहे. त्यामुळे रोजच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह असलेले मोलमजूर, गरीब, खाजगी क्षेत्रातील कामगार, नोकरदार, फेरीवाले, मध्यमवर्गीय व्यापारी, किरकोळ दुकानदार कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. श्रीरामपूर शहरात प्रत्येक परिसरात रोजच्या उत्पन्नावर उदरनिर्वाह चालणारी अनेक कुटुंबे राहतात. काहींकडे अंत्योदय, पिवळे रेशनकार्ड तर काहींकडे केशरी, पांढरे रेशन कार्ड आहेत. बहुतांश गरीब लोकांकडे रेशन कार्डही नसल्याचे खोरे यांनी म्हटले आहे.
जगण्याचा संघर्ष करण्यासाठी प्रत्येक घटकाला अत्यावश्यक धान्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करत प्रत्येक कुटुंबाला सरसकट मदतीचा हात देत दोन महिने पुरेल इतके गहू, तांदूळ, हरबरा डाळ सरसकट वाटण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा सामान्यांच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याने शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती केतन खोरे व स्नेहल खोरे यांनी केली आहे.