श्रीरामपूर | साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 4 मार्च 2020
श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे प्रवरा नदीपात्रात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळू उपसा चालू असल्याचे दिसत आहे. नदीपात्रातून रात्रीच्या वेळी वाळूतस्करी होत असताना महसूल व पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. महसूल प्रशासन व वाळूतस्कर यांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून वाळूतस्करीचा "रात्रीस खेळ चाले" अशी चर्चा रंगू लागली आहे.
महसूल प्रशासन वाळू तस्करांच्या दावणीला बांधले गेले असल्यामुळे वाळू तस्करांवर महसूल प्रशासनाचा वचक राहिला नाही. अनेक दिवसापासून प्रवरानदीपात्रात पाणी असल्याने वाळूचे भाव गगनाला भिडले आहे. प्रवरा नदीपात्रात रात्रीच्या वेळी वाळू उत्खननचा सपाटा चालू आहे. कोणत्याही प्रकारची निविदा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली नाही. रात्रीच्या वेळी वाळू उपसा होत असताना महसूल व पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प आहे. प्रवरा नदीत पाणी असल्याने वाळूचे भाव वाढले आहेत. बांधकाम व्यावसायिकांना वाळूची गरज पडत असल्याने वाळूला मोठी मागणी आहे.
महसूल प्रशासनाच्या आशिवार्दाने वाळू तस्कारांकडून खूलेआम वाळू लूट केली जात आहे. तस्कारांनी प्रवरा नदीपात्रात कडेला मोठेमोठे खड्डे पाडले आहेत. वाळूतस्कारांनी मोठया प्रमाणावर वाळू उपसली आहे. नदी पात्रातील शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांचे मोबाईल कॉल रेकॉर्डची चौकशी होणे आवश्यक आहे.