साईकिरण टाइम्स ब्युरो |दि. 9.मार्च 2020
अहमदनगर|खंडकरी शेतकऱ्याचे खंडाच्या जमिनीचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडून लवकर मंजूर करून घेण्यासाठी, जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कुळ कायदा शाखेतील अव्वल कारकून सुनील बाबुराव फापळे याने, खंडकरी शेतकऱ्याकडून 50 हजार रुपयाची लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्या प्रकरणी सोमवारी (दि 9) श्री फापळे याच्या विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये लाच मागणी बाबतचा गुन्हा दाखल करून फापळे यास अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार हे खंडकरी शेतकरी असून, त्यांचे खंडाचे जमिनीचे प्रकरण जिल्हाधिकारी यांचेकडून लवकर मंजूर करून घेण्यासाठी आरोपी सुनील फापळे यांनी दि.03/03/2020 रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचा समक्ष रु 50 हजार रुपयाची मागणी करुन, सदर रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती. त्याप्रकरणी दि.09/03/2020 रोजी फापळे यांचे विरुध्द पोलीस स्टेशन कोतवाली, अहमदनगर येथे लाच मागणी बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी
दिपक करांडे, पोलिस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर, पर्यवेक्षण अधिकारी हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली.