साईकिरण टाइम्स ब्युरो | दि. 29 फेब्रुवारी 2020
श्रीरामपूर|शहरातील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या गोंधवनी रस्त्यावरील मौलाना आझाद चौक परिसरात नेहमीच भर रस्त्यावर वाहने अस्तव्यस्त लावली जात असल्यामुळे या भागात वाहतुकीची कायम कोंडी होते. येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असताना वाहतूक शाखा कोणतीही कारवाई करत नाही. मौलाना आझाद चौक व शासकीय धान्य गोदाम परिसरात वाहतुकीची सतत कोंडी होत असल्यामुळे व भर रस्त्यावर वाहने लावल्यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी वाहतूक पोलीसाची नेमणूक करून वाहतुकीस शिस्त लावणे आवश्यक आहे. शहरातील मुख्य रस्ता, शिवाजी महाराज रस्ता, नेवासा रस्ता, संगमनेर रस्ता याठिकाणी ज्याप्रमाणे वाहतूक पोलिसांची गाडी फिरते त्याचप्रमाणे गोंधवनी रस्त्यावरही फिरवून वाहतुकीस शिस्त लावणे गरजेचे आहे.
शहरातील गोंधवनी रस्ता हा अत्यंत रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यावर कायम वाहतुकीची कोंडी होत असते. गोंधवनी रस्त्यावरील मौलाना आझाद चौक, पाण्याची टाकीजवळ नेहमीच दुचाकी वाहने अस्तव्यस्तपणे रस्त्यावर लावलेली असतात. त्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये अनेकदा वाद होतात. छोटेमोठे अपघातही होतात. या ठिकाणी वाहतुकीस शिस्त लावणे गरजेचे आहे. या भागातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी येजा करतात.
तसेच श्रीरामपूर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारसमोरील परिसरात तसेच राधिका हॉटेल समोरील परिसरात, नेवासे रस्त्यावर ठिकठिकाणी खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या मधोमध लावली जात असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्या बसेस तसेच प्रवाशांना या खाजगी वाहतूक करणारी वाहने रस्त्यातच उभी केली जात असल्यामुळे अडथळा निर्माण होत आहे. शिवाजी चौकात खाजगी वाहने रस्त्यात अस्ताव्यस्त लावली जात असल्यामुळे शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थी , महिला , नागरिक यांना शिवाजी महाराज चौकातून मार्गक्रमण करताना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. खाजगी प्रवासी वाहने रस्त्यातच लावली जातात त्यामुळे वाहतुकीच्या कोंडी होऊन अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वेस्टन चौकालगतच्या परिसरातही अशाच पद्धतीने रस्त्यात खाजगी प्रवासी वाहने लावली जात असल्यामुळे येथेही वाहतुकीची प्रचंड कोडी होत असते. वाहतूक पोलिसांचे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसल्यामुळे खाजगी प्रवासी वाहनधारक मनमानी पद्धतीने वाहने लावत असतात. वाहतूक शाखेने बसस्थानक परिसर , शिवाजी चौक व वेस्टन चौक परिसरात बेशिस्तपणे खाजगी वाहने रस्त्यात उभी करून वाहतुकीची कोंडी करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
Tags
ताज्या घडामोडी