श्रीरामपूर : स्तनदा मातांना जनगणनेच्या कामासाठी तान्ह्या बाळांना घेऊन घरोघरी फिरण्याची वेळ आलीय. अहिल्यानगर जिल्ह्यात जनगणना करण्यासाठी स्तनदा मातांचीही 'गणना' केली जात आहे. जनगणनेचे कामकाज करताना स्तनदा माता व त्यांच्या निरागस बालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे स्तनदा माता व गरोदर महिलांना जनगणनेच्या कामातून वगळण्यात यावे, असे निवेदन राजेश बोरुडे यांनी मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरूपमा डांगे, अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना दिले आहे.
प्रशासनाच्या निर्दयी भूमिकेमुळे निरागस बालकांसह स्तनदा मातांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. शासन निर्देशनुसार भारतीय जनगणना २०२७ ची कार्य प्रक्रिया सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची जनगणना कार्यासाठी नियुक्ती केली जात आहे. जनगणना उपक्रम हे राष्ट्रीय कार्य आहे, याचीही शासकीय कर्मचाऱ्यांना जाणीव आहे. ते वेळोवेळी शासनाने दिलेल्या निदेशानुसार कर्तव्य पालन करतात. परंतु, अपवादात्मक परिस्थितीत काही घटकांना जनगणनेच्या कामकाजातून सूट मिळण्याची आवश्यकता असल्याचे राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे.
प्रास्तविक जनगणना कार्यासाठी नियुक्त करण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील स्तनदा मातांना वगळण्यात आलेले नाही. जनगणनेचे कामकाज करताना स्तनदा माता व त्यांच्या निरागस बालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. सध्या उन्हाची तीव्रताही प्रचंड आहे. स्तनदा मातांना जनगणना कामकाजासाठी प्रशिक्षण पूर्ण करणे, गृहगणना करणे, गृहक्रमांक देणे, माहिती भरणे, नोंदी करणे, घरोघरी जाऊन जनगणनेशी संबंधित सर्व कार्य करणे, अशी एकूणच सर्व प्रक्रिया पूर्ण करताना स्तनदा माता व त्यांच्या बालकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. यात माता व बालक दोघांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिवाय बालकांना सोबत घेऊन जनगणना कामकाज करणे बालकांना वारंवार स्तनपान करणे मोठे अवघड काम होईल. प्रस्तुत जनगणना कामकाजासाठी नियुक्त केलेल्या 'स्तनदा माता' व 'गरोदर महिलांना' या कामातून सूट मिळण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे जनगणना संचलानालय व नागरिक नोंदणी संचालकांकडेही ई-मेल द्वारे निवेदन सादर करण्यात आले आहे.
.jpeg)